सिंधुदुर्गात : सांगली, जळगाव महापालिकेत भाजपला धक्का दिल्यानंतर आता महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात ही संधी चालून आली आहे. सिंधुदुर्गात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. मात्र, भाजपचे खासदार नारायण राणे हे सांगली, जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती रोखणार का? याची चर्चा सुरू आहे. त्यामुळं या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी २४ मार्च रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मागास (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेवर सध्या नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. ५० सदस्यांच्या जिल्हा परिषदेत राणे समर्थकांची संख्या सर्वाधिक आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँगेस व राष्ट्रवादीच्या तिकिटावर २७ सदस्य, शिवसेनेचे १६ तर भाजप ७ सदस्य निवडून आले होते. परंतु नारायण राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. आता राणे समर्थक असलेल्या भाजपच्या समिधा नाईक यांनी अध्यक्षदाचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होत आहे.