सावित्रीबाई फुले विश्वासाठी आदर्शवत – प्रा डॉ जगदीश खरात

0

आद्य शिक्षिका, वंचितांची माय, आद्य मुख्याध्यापिका व शिक्षणाची ज्ञानगंगा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यात मोलाचे योगदान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले ह्या सर्वांसाठीच आदर्शवत आहेत. स्त्री- पुरुष समानता, जाती निर्मूलन, प्लेग रोगाच्या नियंत्रणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या महान समाजसुधारकाला अस्पृश्यता अजिबात मान्य नव्हती. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून हुंडा शिवाय कमी पैशात लग्न लावून देण्याचा आदर्शवत कित्ता सावित्रीबाई फुले यांनी घालून दिला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सर्वच महिलांनी कणखर बनले पाहिजे असे मत प्रा डॉ जगदीश खरात यांनी व्यक्त केले.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने ग्रंथालय विभागात सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जयंतीच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ राजेंद्र ठाकरे, चेअरमन, ग्रंथालय समिती, प्रा डॉ ईश्वर ठाकूर, चेअरमन, राष्ट्रीय सण व उत्सव समिती, प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, प्रा आय जी गायकवाड प्रा व्ही एस सिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा आय जी गायकवाड यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करून देत समाजउद्धारात त्यांचे योगदान यावर विवेचन केले. यासोबत ज्ञानाच्या कक्षा वृंदावत उपलब्ध ग्रंथांचे वाचन, मनन व चिंतन मोठ्या प्रमाणावर व्हावे हा हेतू अशा कार्यक्रमाच्या आयोजना मागील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी शिक्षणाचे मूल्य ओळखून स्वतः शिक्षण घेऊन असंख्य वंचितांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा गौरव करीत त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. यावेळी कु गायत्री वानखेडे या एफ वाय बी ए च्या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना चूल आणि मूल इतकेच मर्यादित क्षेत्र न ठेवता प्रत्येक महिलेने व्यापक दृष्टिकोन ठेवावा असे मत व्यक्त केले. प्रा डॉ ईश्वर ठाकूर यांनी भारतरत्न पुरस्काराच्या खऱ्या हकदार असून त्या पुरस्कारापासून वंचित असल्याची खंत व्यक्त करीत महिलांनी शिकून संघटित होण्याचे आवाहन केले. प्रा डॉ राजेंद्र ठाकरे यांनी उपस्थितांना आपण सावित्रीच्या लेकी असून समृद्ध वारसा पुढे नेण्याचे आपले साऱ्यांचेच कर्तव्य आहे असे म्हणत प्रत्येकाने समाज उभारणी व समाज उद्धारासाठी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे यांनी अध्यात्मातील सावित्री सारखेच किंबहुना तसूभर जास्त या सावित्रीबाई फुले यांचे योगदान असून असंख्य जीवांना शिक्षण प्रवाहात आणणारी सावित्री पूजनीय असून त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात अमलात आणणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राआय जी गायकवाड यांनी तर आभार प्रा व्ही एस सिसोदे, सहाय्यक ग्रंथपाल यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फरीद तडवी, सुरेखा सोनवणे,  यामिनी पाटील,  पल्लवी पाटील,  सहर्ष चौधरी, अमोल राणे यांच्यासोबतच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here