नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,480 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 354 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,21,49,335 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशात 1,62,468 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (31 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 354 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 104 दिवसांनी मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. याआधी 16 डिसेंबर रोजी 356 जणांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी फक्त महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहाव्या दिवशी राज्यातील मृतांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

