सावधान : देशात गेल्या 24 तासांत 2,263 जणांचा मृत्यू ; तर 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण

1

नवी दिल्ली : भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 2,263 जणांचा मृत्यू झाला आहे. धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 62 लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (23 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,32,730 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,62,63,695पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 86 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 24,28,616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,36,48,159 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

देशातील अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  तर 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 60 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा जीव सध्या धोक्यात आहे. याच दरम्यान रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रुग्णलयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपलब्ध असलेला ऑक्सिजन फक्त दोन तास पुरेल. तसेच व्हेंटिलेटर आणि बीआयपीएपी मशीन नीट काम करत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

1 Comment
  1. Kale mahesh says

    Wellcam

Leave A Reply

Your email address will not be published.