सावदा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून दिवसेंदिवस गंभीर स्थिती बनत चालली आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांसह मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे.दरम्यान, कोरोनाने सावदा येथील एकाच परदेशी कुटुंबातील पाच जण एकापाठोपाठ मृत्यूचे शिकार झाले.
कोरोनामुळे नुकत्याच चार जणांच्या मृत्यूच्या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच बुधवारी (ता. ३१) रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने या कुटुंबावर दुःखाचे आघातवर आघात होत आहेत. ‘आता बस झाले देवा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
आठ ते दहा दिवसांत कोरोनामुळे येथील परदेशी कुटुंबातील चार जणांचा बळी गेला आहे आणि बुधवारी पुन्हा याच कुटुंबातील रामसिंग परदेशी ऊर्फ राजू परदेशी (वय ५८) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (स्व.) गणपतसिंह परदेशी यांचे सहा मुलांचे व एकूण ३५ जणांचे मोठे कुटुंब आहे. त्यापैकी काही वर्षांपूर्वी दोन ज्येष्ठ बंधूंचा, एका मुलीचा तर आता कोरोनामुळे तीन भावांचा मृत्यू झाला. सहा भावंडांपैकी आता केवळ एकच भाऊ संतोषसिंग परदेशी हयात आहे. त्यांना तीन भाऊ, एक सून व वृद्ध आईच्या मृत्यूचे डोंगराएवढे दुःख सहन करण्याची व कुटुंबातील सदस्यांना आधार व धीर देण्याची वेळ आली आहे. लागोपाठ आठ ते दहा दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परदेशी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही.

