सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर कमीतकमी दरात विकावे ; पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

0

बुलडाणा, : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शन आता जिल्ह्यामध्ये 1110 रु ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिली आहे.

रेमेडेसिवीर औषधांच्या दर, उपलब्धतेबाबत जिल्हा केमीस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन समवेत बैठकीचे आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव गजानन शिंदे, अमरावती विभागाचे राम ऐलानी आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन घ्यावी लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीविर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असतांनादेखील एमआरपी दराने हे इंजेक्शन विकून एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची बाब अन्न औषध प्रशासन मंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्दशनास आली. त्यांनी हे दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन त्याची ग्राहकांना विक्री करावी असे आवाहन केले.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रुपयापर्यंत रेमडेसीविर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली असून आता जिल्ह्यात 1110 ते 1400 रुपायापर्यंतच रेमडेसीविर इंजेक्शन मिळणार आहे. तसेच लवकरच सदर कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1110 रुपयात मिळणार असून एकप्रकारे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.