जळगाव | प्रतिनिधी
बा-बापू १५० ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत चोपडा परिसरात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत सातपुड्यातील गौऱ्या पाडाव येथे श्रम संस्कार आणि व्यक्तीमत्व युवा विकास निवासी शिबिर पार पडले. शिबिरात योग, प्रार्थना, श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ३ ते ६ मे दरम्यान हे शिबिर पार पडले.
श्रम संस्कार आणि व्यक्तीमत्व विकास शिबिरात सातपुड्यातील विविध पाड्यांतील गौऱ्या पाडाव, मेलाणे, शेणपाणी, मुळ्यावतार, वैजापूर, डेढीयापाडा, वराड येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. गौऱ्या पाडाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हे शिबीर पार पडले.
शिबिरार्थींचे योगदान : शिबिरार्थींनी गौऱ्या पाडावच्या परिसरात श्रमदानातून जवळपास ६० खड्डे खोदले आहेत. पहिला पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. आवळा, सिताफळ, आंबा या सारखे वृक्षांचे रोपण येथे केले जाणार आहे. परिसराची स्वच्छता, व्यक्तीगत स्वच्छता असे उपक्रम देखील शिबिरात राबविण्यात आले. या शिबिरात किशोर कुलकर्णी- सुंदर हस्ताक्षर, डॉ. अयुब पिंजारी – अंधश्रद्धा निर्मूलन, भुजंग बोबडे – ऐतिहासिक वारसा, सुधीर पाटील – नियम, व्रत आणि व्यसनमुक्त तरुण, विजय मोरे – संघटनात्मक विकास, अमोघ जोशी – आकाशदर्शन आणि खगोल विज्ञान, जितेंद्र महाजन – वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता, दिनेश दीक्षित – व्यक्तीमत्व विकास, जेबराज डेविड – वाडी प्रकल्प, चंद्रकांत चौधरी – पर्यावरणाचे महत्व या विषयांवर व्याख्याने घेण्यात आले.
या शिबिरासाठी सागर चौधरी, गणेश चाफेकर, पद्मावती नाईक, चांदणी गोस्वामी, सुधीर पाटील, चेतन पाटील, वाल्मिक सैंदाणे, चंद्रकांत चौधरी, आचारी संदिप पाटील आणि गौऱ्या पाडाव गावातील ग्रामस्थानी सहकार्य केले.