साकळी येथे भटक्या कुत्र्यांवर खरूजची साथ

0

साकळी (किरण माळी) :  येथे गावात फिरणार्‍या अनेक भटक्या कुत्र्यांवर खरुज रोगाने थैमान घातले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. संबंधित पशुवैद्यकिय विभागाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, येथील गावात फिरणार्‍या भटक्या  कुत्र्यांना सध्या खरुज प्रकारचा रोगाची लागण झाली आहे. या कुत्र्यांचे अंगावरील संपूर्ण केस गळणे, रंग गुलाबी पडणे असा प्रकार दिसून येत आहे. भररस्त्यात  हे कुत्रे  अंग खाजवित असतात. त्यामुळे काही कुत्रे तर अंगाला नियमित खाज येत असल्याने व अति खाजेमुळे या कुत्र्यांच्या अंगावरील भाग कुजत असल्याने ते पिसाळत सुद्धा आहेत. गावातील मुख्य चौक भागात चार-पाच कुत्रे व त्यांची पिल्ले यांना या रोगाची लागण झालेली असून ते नागरिकांच्या गर्दीतून वावरत असतात. तसेच गावातील इतरही भागात असेच खाज रोगाची लागण लागलेले कुत्रे आहेत. खाजेमुळे पिसाळलेल्या कुत्र्यांकडून नागरिकांना तसेच लहान मुलांना चावण्याच्या घटना याअगोदर घडलेल्या असून तसेच यानंतर घडू शकतात. या रोगट कुत्र्यांमुळे इतरही प्राण्यांना तसेच नागरिकांना या संसर्गजन्य खाज रोगाची लागण होऊ शकते. व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

खरुज रोग होतो कसा ?

खरुज हा त्वचेचा एक संसर्गजन्य रोग आहे. ही शरीराला येणारी एक प्रकारची खाज आहे अशी खाज सरकॉप्टस स्कॅबीई या जीवाणूमुळे होते. हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे. हे जीवाणू आकाराने खूपच लहान असतात. ते सारखी त्वचा खोदत असतात. त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज सुटते. रात्री ही खाज अजूनच वाढते. हे जीवाणू माणसाच्या सामान्य नजरेला दिसत नाहीत, परंतु भिंगाच्या किंवा सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने बघता येतात.

कुत्र्यांच्या या आजारावर औषध पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून लवकरच यावर उपाययोजना करणार आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन येथील पशू वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रीती पाटील यांनी ‘लोकशाही’ प्रतिनिधीशी बोलतांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.