Thursday, September 29, 2022

साकळीसह परिसरातील भोनक नदीपात्रातून सर्रासपणे रेती वाहतूक !

- Advertisement -
महसूल प्रशासन करते काय ? 
 नदीपात्रात मोठमोठे खड्डे
साकळी ता.यावल – (किरण माळी )
येथील परिसरातून वाहणार्‍या भोनक नदीपात्रातून गेल्या कित्येक दिवसांपासून नदीपात्रातून  ‘ राजरोसपणे ‘ दिवसा-ढवळ्या रेती वाहतूक चोरी सुरू आहे. मात्र संबंधित महसूल प्रशासन याबाबत अगदीच ‘अनभिज्ञ ‘ असण्याचे भासवत आहे. तरी कारवाई करून ‘आम्ही मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर!’ अशी नाममात्र कारवाई केली जाते. म्हणूनच रेतीवाल्यांना चांगलेच फावते. मग महसूल प्रशासन नेमके करते तरी काय ? असा प्रश्न निर्माण झालेले असून नैसर्गिक रित्या तयार झालेले नदीपात्र  बेसुमार रेती वाहतूक करणाऱ्या  वाहतूकदारांपासून वाचवले जावे. अशी मागणी निसर्गप्रेमी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,  सातपुड्याचा उगम पावणारी भोनक नदी साकळी सह परिसरातील कित्येक कि.मी.च्या अंतरातून वहात जाते. या नदीच्या रूपाने परिसराला एक वेगळे निसर्ग सौंदर्य प्राप्त झालेली असून या नदीमुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न नैसर्गिकरित्या सोडविला जातो. शेतीच्या भागातील विहिरींची व कूपनलिकांची जलपातळी सुध्दा नदीमुळे स्थिर ठेवली जाण्यास मदत होते. असे असतांना व सारे काही नदीचे फायदे ठाऊक असतांना सध्या नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे करून रेती वाहतूकदारांकडून ‘राजरोसपणे ‘ रेती वाहतूक केली जात आहे. व ही वाहतूक चक्क दिवसाढवळ्या केली जात आहे. रेती वाहतूकदारांकडून अगदी बिनबोभाटपणे व आपल्या मालकीची ‘ जहागिरी ‘ समजून नदीचे पात्र ओरबडले जात आहे. हे रेती वाहतूकदार एवढे ‘ मस्तवाल ‘ बनले आहे की ते कुणालाही वा कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. अशा आवेशात दररोज रेती वाहतुकीचा धंदा करीत आहे. तसेच रेतीच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात ‘ ‘आर्थिक ‘ माया गोळा करीत असून आपली मोठी संपत्ती जमवित आहे. तसे या धंद्यातून रेतीवाला यांची दादागिरी व मगरुरी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असे. जेव्हा रेतीच्या ट्रॅक्टरने जेथे रेती पोहोचवायची आहे त्या रस्त्याने पुढे पुढे मालकाचे वाहन चालत असते. असा रेती वाहतुकीचा दररोजचा पाढा सुरु आहे.यंदाचा पावसाळा चांगला झाल्याने नदीत मोठ्या प्रमाणात  रेती वाहून आल्याने रेतीवाल्यांना चांगलेच हिरवे कुरण  मिळाले आहे. मात्र या अश्या  ‘बेफान ‘ रेती वाहतूकदरांमुळे नदीपात्रास गेल्या अनेक दिवसांपासून मोठी अवकळा येणार आहे. हे मात्र नक्की आहे. संबंधित रेतीवाले नदीपात्रात जेसीबी मशीन द्वारे रेती बाहेर काढून वाहतूक करीत आहे. त्यामुळे नदीपात्रात कित्येक फूट खोल व लांबच-लांब असे मोठेमोठे खड्डे बनले असल्याने भविष्याच्या दृष्टीने हे खड्डे धोकेदायक बनणार आहे. या खड्ड्यांमुळे नदीचे सपाट पात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकूणच या गंभीर प्रकाराकडे संबंधित महसूल प्रशासनाने लक्ष देऊन रेती वाहतूकदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.
महसूल प्रशासनाची ‘ चुप्पी ‘?– सदरील भोनक नदीपात्रातून सर्रासपणे वाहतूक होणाऱ्या रेती वाहतूकीकडे महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत आहे. ज्या ठिकाणी दर्शनी भागात रेती वाहतुकीचे चित्र स्पष्ट दिसते त्या भागाकडून महसूल विभागाचे अधिकारी वापरत असतात. मात्र त्यांचे या रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष का होत आहे ? मग त्यांनी या रेती वाहतूकदारांशी ‘ संगनमत ‘ केलेले आहे का ? या अधिकाऱ्यांना निसर्गाच्या होणाऱ्या हानीचे सोयरसूतक  नाही का ?  अधिकारी रेतीवाल्यांच्या मगरूरीपुढे घाबरतात का ? असे गंभीर आरोप निसर्गप्रेमी नागरिकांकडून महसूल अधिकाऱ्यावर केला जात आहे.
प्रशासनाचे फक्त तापी कडे लक्ष ! – थोरगव्हण- शिरागड परिसरातल्या तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तालुक्याची महसूल यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज आहे. मात्र या यंत्रणेचे भोनक नदीच्या पात्रातील रेती वाहतुकीकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. साकळी सह परिसराचा नदीरुपी निसर्गाचा अनमोल ठेवा वाचवण्यासाठी  संबंधित यंत्रणेने भोनक नदीपात्रातून सुद्धा अवैधरीत्या वाहतूक होणाऱ्या रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी निसर्गप्रेमी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या