सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. यात यात 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील चितळी येथील सहा जण नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला निघाले होते. पारेकरवाडी येथून सातारा जिल्ह्यातील चितळी येथे गाडीने जात असताना गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याचे भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झालं नाही आणि त्यात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. तर हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत. या अपघातात मच्छिंद्र पाटील (वय ६० वर्ष), कुंडलीक बरकडे (वय ६० वर्ष), गुंडा डोंबाळे (वय ३५ वर्ष), संगीता पाटील (वय ४० वर्ष), शोभा पाटील (वय ३८ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.