नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सुरु असलेली सोने-चांदीच्या किंमतीतील घसरण सुरूच आहे. आज सलग 5 व्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, तर चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. ज्यामुळे सोन्याचे दर एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. आज, एमसीएक्सवरील जूनचे सोन्याचे वायदे 0.3 टक्क्यांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 44,300 वर बंद झाले. खरंतर, गेल्या सात दिवसांत पाचव्या वेळी तो घसरला आहे. आता जर चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी 0.8% घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
सोन्याचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,300 रुपयांवर पोहोचले. जी एका वर्षाची सर्वात खालची पातळी आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,683.56 डॉलर प्रति औंस झाले.
चांदीच्या नव्या किंमती
चांदीच्या किंमती बुधवारीही कमी झाल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात चांदी 0.8% घसरून 62,617 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव आज औंस 24.01 डॉलरवर कायम आहे.
सोने का झाले स्वस्त?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्यात. डॉलरच्या मजबुतीदरम्यान न्यूयॉर्कमधील सध्याच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये लोकांनी जोरदार विक्री केली. यासह सोने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.


