सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जातोय – अजित पवार 

0
‘मेस्मा’ लावण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी  आक्रमक
मुंबई ;-
अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवा कायद्याखाली ‘मेस्मा’ लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करत असून त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी शिवसेनेने केली तर मेस्मा कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी मेस्मा कायदा मागे घेण्याची आक्रमकपणे मागणी केली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी सेनेने केली. शिवसेनेचा यासाठी पहिल्यापासून विरोध असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला.
… तर कामकाज चालू देणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेस्मा रद्द करण्याची मागणी केली. जोपर्यंत अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा मागे घेतला जाणार नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार अशी भूमिका त्यांनी घेतली. मेस्मा लावणे हे सरकारचे निषेधार्ह पाऊल आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नसल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.