समाजाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दबाब आणायला हवा : डॉ.प्रदीप जोशी

0

जळगाव : अलीकडे समाजमाध्यमातून अतिरंजित बातम्या देण्याचा प्रकार खूप घडले. सकारात्मक बातम्या देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. सोशल मिडिया माध्यमात कुणीही वाटेल त्या पोस्ट टाकत होते. दुर्दैवाने अनेक सुशिक्षित वर्गाकडून देखील असे प्रकार झाले. समाजाबाबत असलेल्या आपल्या कर्तव्यात आपण कमी पडलो आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात फार हेळसांड झाली आहे त्यात परीक्षांचा गोंधळ सुरूच आहे. ते दडपण मुलांवरच नाही तर पालकांवर देखील असते. त्याचे परिणाम आयुष्यभर राहणार आहे. भविष्यात आरोग्यसेवा हा सर्वात महत्वाचा विषय होणे गरजेचे आहे. समाजाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत होण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दबाव आणायला हवा असे प्रसिद्ध जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी सांगितले.

जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासियांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते ‘कोविडचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम आणि समस्यांचे निवारण’ या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी आणि सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.सतिष पाटील, डॉ.दिलीप महाजन हे देखील सहभागी झाले होते.

आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, जळगाव आयएमएतर्फे आयोजित या व्याख्यानमालेत गेल्या दोन दिवसात उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. अनेकांच्या मनातील भिती त्यामुळे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएमएचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील विविध शंकांवर कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांची चिकित्सा करणाऱ्या मार्गदर्शनपर सत्रांचे आयएमएतर्फे लवकरच आयोजन करण्यात येईल. समाजाच्या रक्षणासाठी कालानुरूप पाऊले उचलण्यात येतील असे डॉ.चौधरी यांनी सांगितले.

मुख्य वक्ते डॉ.प्रदीप जोशी यांनी तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले की, कोरोनाचे हे वैश्विक महासंकट आहे. संकटात समाजातील बंध विस्कळीत झाले म्हणून समस्या निर्माण झाल्या. प्रत्येक महासंकटाचे ४ टप्पे असतात. समाज एखादे महासंकट आले की समाज विस्कळीत होतो. महासंकट टप्प्याटप्प्याने येते. पहिल्या टप्प्यात आपण गाफील राहतो आणि संकटकडे गांभीर्याने पाहत नाही. कोरोनाबाबत आपल्याला चीन, कोरियाच्या माध्यमातून कळले. आपल्याकडे ऊन खूप असते कोरोना येणार नाही असे आपल्याला वाटले परंतु तो काळ आपल्यासाठी संकेत होते. दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला कोरोनाचे गांभीर्य कळले नाही मात्र काही लोक याबाबत गंभीर होते इतरांनी मात्र ते हसण्यावारी घेतले. महासंकट आले तेव्हा आपण गांगरून गेलो. आपण गांगरून जातो, चिंता निर्माण होते काहीसा आत्मविश्वास डगमगतो. काही लोक घाबरले तर काही जण निष्काळजी झाले. तिसरा टप्प्यात शासकीय व सामाजिक मदतीमुळे आपण आश्वस्त झालो. चौथ्या टप्प्यात आपल्या अपेक्षा वाढतात त्यामुळे आपण यंत्रणेतील त्रुटी आणि चुका काढतो, असे डॉ.प्रदीप जोशी म्हणाले.

सर्व टप्प्यातून जात असताना आपल्यासह कुटुंबावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले. कुटुंबातील जेष्ठांमधील एकाकीपण वाढले. लॉकडाऊनमुळे झालेल्या अतिसहवासामुळे कुटुंबात खटके उडण्याचे प्रमाण वाढले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी कुटुंबासह आनंद घेतला. सर्व फार फार महिनाभर चालले त्यानंतर एकमेकांच्या संबंधावर आणि कुटुंबावर त्याचे परिणाम होऊ लागले. कालांतराने नैराश्य आणि व्यसनाधीनता वाढली. आकडेवारी सांगते की, लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार वाढले. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली त्यामुळे जीवनशैली टिकवणे कठीण झाले. मनस्वास्थ खराब होऊ लागले. सुरुवातीला कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडले परिणामी नागरिकांच्या मनस्वास्थावर परिणाम होऊ लागला. समाजावर असे संकट आले तेव्हा एकमेकांवर दोष देत राहिले. त्यामुळे समाजाची एकसंघता भंग झाली. हे केवळ भारतात झाले नाही तर जगभर झाले. समाजातील बरेच घटक अद्यापही बेजबाबदारपणे वागत आहे. नेतृत्वात आपण कमी पडतोय की काय याचा विचार करणे गरजेचे आहे. एकत्र कुटुंबामुळे एकमेकांना मानसिक आधार मिळण्यास मदत झाली. कुटुंबप्रामुख्याने खरे काय याची माहिती कुटुंबियांना देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपली जागा आणि वेळ द्या. सतत नातेवाईकांना वेळ द्या. हे संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे ठरवायला हवे, असे डॉ.प्रदीप जोशी यांनी सांगितले.

जळगाव आयएमएतर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप डॉ.प्रदीप जोशी यांनी सुनील पवार यांच्या समय रूक गया हैं, हम नही। हौसला बुलंद है, कमी नही। या कवितेने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.