ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव | प्रतिनिधी
सरकारी नोकर्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे, सर्व ठिकाणी भ्रष्टाचार होतांना दिसून येत आहे. समाजात फक्त शिक्षक व सैनिक हे दोनच घटक भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे मत ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राजकारण्यांसह सर्व घटकांना भ्रष्टाचाराची लागण झाल्याचा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी सरकारी नोकरांच्या सहकार पतपेढीच्या सत्कार सोहळ्यात लगावला.
ग.स.सोसायटीतर्फे शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 450 हुन अधिक गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला.
तसेच पुढे बोलतांना ना. पाटील म्हणाले की, लोकांना वाटतं की आमचा धंदा चांगला आहे. मात्र, प्रत्येक जण त्यांच्या जागी बरोबर असतो, त्यामुळे आमचा धंदा चांगला की, वाईट हे आम्हालाच माहित आहे. तुम्ही एकदा नोकरीला लागले की, 60 वर्षापर्यंत टेन्शन राहत नाही, राजकारणात मजिधर दम उधर हमम करावे लागते. निवडून येण्यासाठी पक्ष बदलावे लागतात. त्यामुळे आमचा धंदा चांगला असे म्हणता येणार नाही, राजकारणातील वाढत्या ताण तणावामुळे 288 पैकी 244 आमदारांना बी.पी. शुगरचे आजार भेडसावत असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संबोधतांना ना. पाटील म्हणाले की, प्रत्येकासाठी शिक्षणासोबत प्रॅक्टीकल नॉलेज महत्त्वाचे आहे. प्रॅक्टीकल ज्ञान असेल तर, यश नक्की मिळते असे सांगून एक बारावी शिकलेला माणूस आमदार होऊन जिल्हाधिकार्यांना आदेश देतो हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
प्रेमातून पैसा व यश मिळतं
कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोणतीही संस्था चालवण्यासाठी अथवा काम करण्यासाठी विश्वास असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी एका लहानशा गोष्टीद्वारे अत्यंत मोलाचा सल्ला यावेळी दिला. त्यांनी सांगितले की, पैशाच्या अथवा यशाच्या मागे न धावता प्रेमाने राहिले पाहिले. प्रेमाने राहिल्यास पैसा व यश आपोआपच मिळत असल्याचे ते म्हणाले.
मोठ्याप्रमाणावर वृक्ष लागवड करा
आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, राजकारण आणि संस्था येथे विरोधक हे असतातच; मात्र याकडे लक्ष न देता आपले काम केले पाहिजे, असे मत आ. भोळे यांनी मांडले. तसेच गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणावर दुष्काळाचा सामना सर्वांना करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी वाया जाऊ न देता जमिनीत जीरवा, तसेच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे रक्षण करा, असे आवाहन आ. भोळे यांनी केले
वंचित घटकांसाठी न्याय योजना हवी
ग.स.सोसायटीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्याला सत्कार सोहळा ऐवजी प्रेरणा सोहळा असे नाव द्यायला हवे, गुणवंतांचा गौरव हा त्या गुणवंताच्या आयुष्यातील प्रेरणा देणारा असतो, असे मत खा. उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच ग.स.ने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले. परंतु यापुढे आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे, एखादी वंचित घटकांना न्याय देणारी योजना आणली पाहिजे किंवा शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे, असे आवाहनही खा. पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे नवनवीन नावीन्य कल्पनांना वाव देणारे प्रदर्शन, कार्यशाळा संस्थेने आयोजित केल्या पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.