नागपूर – मुंबई शहर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेलं शहर ठरलं आहे. एकट्या मुंबईमध्ये आजपर्यंत ५९,२०१ कोरोना रुग्ण सापडले असून त्यातील ३० हजार १२५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत २६,८२८ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. अशातच आज भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीवरून एक मोठं विधान केलं आहे.
एका ऑनलाईन चर्चासत्रामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी, “सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,” असं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, मुंबईत सोमवारी एका दिवसात ३१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांपेक्षा कोरोनमुक्तांची संख्या अधिक झाली असून मुंबईतील करोनामुक्तीचा दर ५० टक्के झालाय. असं असलं तरी काल दिवसभरात १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला.