संपत्तीच्या वादातून भरदिवसा काकाकडुन पुतण्याचा खुन

0

पाचोरा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागात वडिलोपार्जित पिठाची गिरणी व शेतीच्या वादातून दि. २ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या दरम्यान सख्खे काका व चुलत भावाने पुतण्याच्या डोक्यावर लोखंडी सळई ने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने जळगाव येथे उपचार घेत असतांना निधन झाले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात दि. ३ रोजी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागात गोरख मोरे व सिध्देश्वर मोरे या दोघ भावांची वडिलोपार्जित पिठाची गिरणी होती. सदरची गिरणी गोरख मोरे हा अनेक वर्षांपासून चालवित होता. कालांतराने त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा किशोर गोरख मोरे हा गिरणी चालवित असताना त्याचे काका सिध्देश्वर संदिप मोरे व चुलत भाऊ सोमनाथ सिध्देश्वर मोरे यांनी पिठाची गिरणी किशोर मोरे याचेकडुन बळकावून घेतली. यामुळे किशोर मोरे हा सतत पिठाच्या गिरणीत जावुन माझी पिठाची गिरणी मला परत द्या असे सांगून हुज्जत घालीत असे. दि. २ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या दरम्यान किशोर मोरे गिरणीत आल्यानंतर काका व चुलत भावाशी हुज्जत घालीत असतांना काका सिध्देश्वर मोरे व चुलत भाऊ सोमनाथ मोरे यांनी किशोर यास लोखंडी सळई डोक्यात मारल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री १२:३० वाजेच्या दरम्यान त्याचे निधन झाल्याने मयत किशोर ची आई सुलोचना गोरख मोरे राहणार शिवाजी नगर (पाचोरा) हिने काका सिध्देश्वर मोरे वय- ५४ व चुलत भाऊ सोमनाथ सिध्देश्वर मोरे वय – ३१ राहणार शंकर नगर, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहेत. आरोपींना शोधन्यासाठी हवालदार प्रकाश चौधरी, प्रदिप चांदेलकर, किरण पाटील व विजय महाजन तातडीने आरोपी जेरबंद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.