जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन ः जिल्हा माहिती कार्यालय आयोजित
सोशल मीडिया महामित्र संवादसत्रास उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगाव, दि. 15 –
काळानुरुप माध्यमांमध्ये मोठया प्रमाणात बदल होत आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अधिक व्यापक स्वरुपात होत आहे. सोशल मीडियाचा विवेकी पद्धतीने प्रभावी वापर केल्यास त्याचा समाजाला निश्चित उपयोग होईल. सोशल मिडीयाच्या माध्यमांतून व्यक्ती स्वातंत्र जोपासण्याबरोबर विधायक संदेशासाठी महामित्रांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित सोशल मीडिया महामित्र संकल्पनेंतर्गत संवादसत्र कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, मनोज महाजन, दत्ता नाईक आदि उपस्थित होते. नुतन मराठा महाविद्यालयाच्या डॉ. जगदीशचंद्र बोस सभागृहात हा कार्यक्रम झाला.
नागरीकांनी सोशल मिडीयाचा वापर करताना विधायक संदेशांचा प्रसार करावा. त्याचबरोबर चुकीचे संदेश प्रसारीत होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, सध्या सोशल मीडियाचा वापर वाढलेला असून एखादी व्यक्ती किंवा घटनेची प्रतिमा तयार करण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी महामित्रांची मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल मिडीयाच्या वापराला विधायक वळण देण्याची गरज असल्याने माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम घेण्यात आला. शासनाच्या कल्याणकारी योजना समाजापर्यंत जाण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजामध्ये चांगले संदेश जावून विवेकी प्रवृत्ती वाढविण्यास आणि विधायक बाबी घडण्यास यामुळे मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी सोशल मीडिया महामित्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या संवादसत्रास परीक्षक म्हणून सह दुय्यम निबंधक सुनील पाटील, दै. जनशक्तीचे निवासी संपादक शेखर पाटील, दै. देशोन्न्तीचे आवृत्ती प्रमुख मनोज बारी, दैनिक साईमत चे कार्यकारी संपादक विजय वाघमारे, धरणगांव महाविद्यालयाचे प्रा. बी. एन. चौधरी, बेंडाळे महाविद्यालयाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. मंजुषा पवनीकर, संजय सपकाळे यांनी काम बघितले. तर निरिक्षक म्हणून दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक विकास भदाणे, सुरेश सानप, किशोर शिनकर यांनी काम बघितले.
सोशल मिडीया महामित्र उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने नुतन मराठा महाविद्यालयात सेल्फी पॉईट तयार करण्यात आला होता. याठिकाणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भेट देऊन महामित्र उपक्रमात सहभागी झालेल्यासोबत स्वत:चा सेल्फी घेतला. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करुन माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे आयोजित सोशल मिडीया महामित्र उपक्रमाची माहिती दिली.परिक्षकांच्यावतीने बोलतांना श्री. शेखर पाटील म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महांसचालनालय विविध विधायक उपक्रम राबवित असून सोशल मिडीया महामित्र या उपक्रमांतून तयार होणारे महामित्र हे शांतीसेनेचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोटे वृत्त तसेच अफवा पसरविल्या जातात त्यांना महामित्र उपक्रमामुळे आळा बसण्यास मदत होईल असे विचार प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सहभागी युवक / युवतींना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाची एक वर्षाची वर्गणी भेट स्वरूपात देण्यात आली.