जळगाव: साकेगावजवळील कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनीतील कोरोना संशयीत वृद्ध महिलेचा मृतदेह जळगाव येथील मयत वृद्धेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी भूसावळ कब्रस्थानात मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर निदर्शनास आला. ही अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार संजय सावकारे आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत, त्याचे मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याने तणाव निवळला.
भुसावळातील मुस्लीम कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसापूर्वी अस्वस्थपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस गोदावरी रुग्णालयातील सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर गुरुवारी रात्री महिलेच्या नातेवाईकांना गोदावरी रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले होते. आज सकाळी फातिमाबी यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा रुग्णालयाने प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेला मृतदेह ताब्यात देऊन तो सरळ कब्रस्थानात नेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या.
त्यानुसार, फातिमाबी यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन भुसावळला गेले. त्यानंतर कब्रस्थानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी फातिमाबी यांच्या मुलींनी अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॅग उघडून पाहिली असता, त्यांना जबर धक्का बसला. तो मृतदेह फातिमाबी यांचा नव्हता. या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार आणि आमदार संजय सावकारे यांनी मुस्लिम कॉलनी कडे धाव घेतली.