आषाढीची परंपरा कायम ; पांडुरंग दर्शनाची आस
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून श्री संत मुक्ताईचा जयघोष करीत हजारो वारकरी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे शनिवारी रवाना झाले. रणरणत्या उन्हांची तमा न बाळगता आदिशक्ती संत मुक्ताबाई समाधीस्थळावरून निघालेला आषाढी वारी पालखी सोहळा मजल-दरमजल करीत आता पंढरपूरकडे रवाना झाले आहे. मुक्ताईनगर येथून शेकडो वर्षापासून अखंडितपणे आषाढी एकादशीला विठूरायाच्या भेटीसाठी संत मुक्ताबाई पालखी सोहळा जाण्याची परंपरा कायम आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता विधीवत पादूका पूजनाने पालखी मार्गस्थ झाली.
पादुकांचा मंगल अभिषेक
शुक्रवारी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कोथळीत दाखल झाले होते. पहाटे मंगल काकडा भजनानंदात संत मुक्ताबाई महापूजा अभिषेक पुंडलिकराव पवार, चापोरा यांनी सपत्निक केला. मुक्ताबाई संस्थानचे मानकरी भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पादूकांना मंगल अभिषेक व आरती केली. वारकरी भाविक भजन गात पावली खेळत तल्लीन झाले होते. मंदिर परीसरात केळीचे खांब, आंब्याची तोरणे लावल्याने मंगलमय वातावरण तयार झाले. सकाळी 11 वाजता नैवेद्य देवून महाआरती करण्यात आली. मुक्ताबाई मुक्ताबाईच्या जयघोषात पादूका पालखीत ठेवून सोहळा मंदिर परीक्रमा करीत मार्गस्थ झाला.
संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, माजी मंत्री एकनाथराव खडसे , खासदार रक्षा खडसे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समितीचे सभापती शुभांगी भोलाणे, विकास पाटील, यु.डी.पाटील, जगदीश पाटील , सम्राट पाटील, व्यवस्थापक विनायकराव हरणे-पाटील, उध्दव महाराज, जुनारे मुक्ताईनगर, पंकज महाराज पाटील, नितीन महाराज, विशाल महाराज, विजय महाराज, रतीराम महाराज, वाल्मिक महाराज, अंबादास महाराज, विनोद सोनवणे, योगेश कोलते, सदा पाटील, पूजारी व्यवहारे आदी उपस्थित होते.तर पुंडलिकराव दामोदर पवार चापोरा यांनी संस्थांनमध्ये व वासुदेव निवृत्ती महाजन यांनी नवीन गावात अन्नदान केले.
मुक्ताईनगर शहरात पालखी सोहळ्याचे आगमन होताच ठिकाणे फटाके फोडून सोहळ्याचे स्वागत झाले. नगराध्यक्ष नजमा तडवी, मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी सीमेवर पालखी पूजन केले. सोहळा नवीन मुक्ताबाई मंदिरात दुपारी विसावा घेवून सातोड गावात येताच जल्लोषात स्वागत झाले. भावराव पाटील व शेषराव पाटील, सातोड यांनी आदरातिथ्य केले .
सोहळ्यात व्यसनमुक्तीचा संदेश देत शनिवारी दिवसभरात 27 युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. मानवी जीवनाचे महत्त्व वारकरी संप्रदाय विचारातून कळल्याने आदिशक्ती मुक्ताबाईला साक्ष ठेवून मी सर्व व्यसनांचा त्याग करीत असून इतरांना प्रेरीत करीत राहील, अशी शपथ रवींद्र महाराज यांनी दिली.