श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू

0

पंढरपूर ! लोकशाही न्युज नेटवर्क –

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्णत्वास येत आहेत. त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. सध्या रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत देवाचे लांबून दर्शन सुरू आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापुर्व नियोजनाबाबत मंदिर समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. सदरचे काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, २ जून पासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. असे असले तरी भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.