कोलंबो: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील पंचतारांकित हॉटेल आणि चर्चवर रविवारी झालेल्या साखळी बाँबस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर पोहोचला असून असून जऴपास 500 जण जखमी झाले आहेत. त्यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हे हल्ले अत्यंत भयावह असल्याचे म्हटले आहे. ‘श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलांवर झालेले हल्ले अत्यंत भयावह आहेत. या घटनेचा परिणाम भोगावा लागलेल्यांबद्दल माझ्या मनात सहवेदना आहेत,’ असे थेरेसा मे यांनी म्हटले आहे. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकेतील नागरिकांना ऑस्ट्रेलिया आपल्या सहवेदना कळवत आहे. आमच्या प्रार्थना आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे, असे मॉरिसन यांनी म्हटले असून, या घटनेनंतर त्यांनी श्रीलंकेला मदतीचे आश्वासन दिले आहे.
कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.