शेगाव – सालाबादाप्रमाणे श्री गजानन महाराज संस्थानकडून संतश्रेष्ठ श्री संत गजानन महाराजांचा 142 वा प्रगटदिनोत्सव 15 फेब्रुवारी शनिवार रोजी भक्तीमय वातावरणात व हर्षोल्लासात संतनगरात साजरा करण्यात आला. दुपारी 2 वाजता श्रींच्या पालखीची भव्य नगर परिक्रमाशहरातून प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली.

श्री गजानन महाराज संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी 10 फेब्रुवारीपासून या उत्सवास आरंभ झाला होता. यामध्ये सकाळी काकडा, भजन, प्रवचन, कीर्तन व महारुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. तर आज 15 फेब्रुवारी रोजी सकाळी यागाची पुर्णाहुती व अवभृतस्थान संस्थानचे विश्वस्तांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तद्ननंतर सकाळी 10 ते 12 श्री ह.भ.प. श्रीरामबुवा ठाकूर, परभणी यांचे श्रींचे प्रागट्यानिमित्त कीर्तन पार पडले. दुपारी 12 वाजता महाआरती संपन्न झाली. दोन लाखावर भाविक भक्तांनी प्रगटदिनी श्रींचे दर्शनासाठी हजेरी लावली. मंदीरात दर्शनासाठी 3.30 ते 4 तासाचा अवधी लागला. भक्तांचे दर्शन लवकर व्हावे यासाठी संस्थानकडून रात्रंदिवस मंदीर खुले ठेवण्यात आले होते. या उत्सवामध्ये राज्यातील 17 जिल्ह्यातून एकूण 1244 भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. या दिंड्यांपैकी 11 जिल्ह्यांमधून 211 दिंड्या पायी आल्या. त्यामध्ये यवतमाळ ते शेगाव – 310 कि.मी., 11 दिवस, बीड ते शेगाव – 260 कि.मी. 10 दिवस, नांदेड ते शेगाव – 250 कि.मी., औरंगाबाद ते शेगाव – 230 कि.मी., 10 दिवस, जळगाव ते शेगाव 170 कि.मी. 5 दिवस, 10 दिवस, अमरावती ते शेगाव 150 कि.मी. 5 दिवस, जालना ते शेगाव – 150 कि.मी. 6 दिवस, हिंगोली ते शेगाव – 120 कि.मी. 5 दिवस, वाशिम ते शेगाव – 120 कि.मी. 5 दिवस, बुलडाणा ते शेगाव – 120 कि.मी. 4 दिवस, अकोला ते शेगाव – 50 कि.मी. 2 दिवस असा पायी प्रवास करीत संत नगरीमध्ये ह्या दिंड्या दाखल झाल्या.
श्री क्षेत्र शेगाव वारीच्या ह्या वाटचालीमधील प्रवासामध्ये भजनी दिंड्यांचे मुक्कामाचे ठिकाणी तेथील ग्रामस्थांनी उत्साहपूर्वक स्वागत करुन त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था मंदीर, शाळा, मंगल कार्यालय आदी ठिकाणी उत्तमप्रकारे केली होती. श्री संस्थेद्वारे उत्सवामध्ये सहभागी झालेल्या हा भजनी दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या 110 भजनी दिंड्यांना 10 टाळजोड, 1 मृदंग, 1 विणा, 1 हातोडी, 4 पताका व संत वाङमय ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा, श्री एकनाथी भागवत अशा साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्ती करीता अंशदान (मदत) व उत्तेजनाथ बक्षिस सुद्धा वितरीत करण्यात आले.
उत्सवकाळात सदर दिंड्यांची भोजन व्यवस्था श्री संस्थेद्वारे करण्यात आली होती. तसेच वारकरी, भक्तांना संस्थेमार्फत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. सर्व दिंड्यांमध्ये एकूण 52, 939 वारकरी सहभागी झाले होते. तसेच श्री क्षेत्र शेगाव व श्रींचे पंढरपूर, आळंदी, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर या शाखांमध्ये एकूण अडीच लाखावर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच सर्वतोपरी सुविधा श्री भक्तांना संस्थेकडून पुरविण्यात आल्या.

