जळगाव | प्रतिनिधी
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेवून ते न बांधणार्या उर्वरित 270 नागरिकांविरुद्ध उद्या गुन्हे दाखल होणार आहेत. आज दि. 25 रोजी अनुदान परत करण्यास शेवटची मुदत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेवून ते न बांधणार्या शहरातील 407 नागरिकांविरुद्ध शहरातील त्या- त्या भागातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. संबंधित नागरिकांनी वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी सहा हजार अनुदान लाटले आहे. मात्र त्यांनी आजतागायत शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर 239 नागरिकांनी अनुदान परत केले आहे. गेल्या आठ दिवसांत 87 लोकांनी अनुदान परत केले आहे. शहरात 407 जणांनी महापालिकेकडून अनुदान लाटले होते. त्यातील 50 लोकांनी बांधकाम केल्याचे फोटो प्रशासनाकडे सादर केलेले आहेत. उर्वरितांनी अनुदानही परत केलेले नाही व शौचालयही बांधलेले नाही. अशा २७० नागरिकांविरुद्ध अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नसून आज दि. 25 रोजी शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.