मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने आज मंगळवारी सकाळी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला.
राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे. वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशी विकास, राज्याचा वारसा, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास, रेल्वे विकास, सुराज्य अशा विविध बाबींवर या जाहिरनाम्यातून घोषणा करण्यात आल्या आहेत.
भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा, मेगावॅटचे पवन ऊर्जा आणि मेगा वॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम, राज्यात नव्या IIT, IIM, AIIMS या उच्च शिक्षण संस्था उभारणार, औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारणार, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 5 आयटीपार्क उभारणार, राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नॉलॉजी पार्क, कंत्राटी कामगारांसाठी लवादा बनवणार. धनगर समाजाला 1000 कोटींचे विशेष पॅकेज, अनुसुचीत जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर, अनुसुचित जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्नसाठी प्रयत्न, प्रमुख शहरात सीसीटीव्हीचे जाळे पूर्ण करणार, अपराध सिद्धतेबाबत सुधारणा करणार, पोलीस खात्याचे काम अधिक प्रभावी करणार आहे.
दोन वर्षात महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करणार, १५,००० अद्ययावत आरोग्य केंद्रे उपलब्ध करणार असल्याचे म्हटले. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार व्यवस्था, आर्थिक विकासात ५० टक्के भागीदारी, बालसंगोपन सुविधांमध्ये तीन पट वाढ करणार, रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणार, स्त्री-पुरुष समानता या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणार, तसेच गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान देणार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा संरक्षण, मासेमारीसाठी कमी दरात कर्ज व विक्रीसाठी आधुनिक सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न, सरकारच्या विविध योजना प्रभाविपणे राबवणार, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्यातील 8 शहरांमध्ये नवीन विमानतळ सुरु होणार, किफायतशीर दरात नागरी विमान सेवा सुरु होणार, शेतीमाल निर्यातीसाठी विमानसेवा विकसित होणार असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर कोकणातील बंदरं रेल्वे व महामार्गांनी महाराष्ट्राला जोडणार, मुंबई उपनगरात जलवाहतूक सेवा सुरु होणार, मुंबई-सिंधुदुर्ग जलमार्ग सुरु होणार असल्याचे या संकल्प पत्रात सांगण्यात आले आहे.