शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करू नका! अण्णा हजारेंना गिरीश महाजनांची विनंती

0

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत पोहोचले. आंदोलन करू नये, अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता.

 

त्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी आंदोलनासंबंधी अण्णांसोबत चर्चा केली. आंदोलन न करण्याची विनंती आपण अण्णांना केली आहे. गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, मागील आंदोलनावेळी महाजन यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती.

 

अण्णांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सिमीत आहे, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.