शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी

0

सहकार्य करण्याचे आवाहन : आर्थिक राहणीमान, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, उत्पन्न, इ. माहिती

जळगाव, 23 –
महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत कुटुंबांची जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी आणि कर्जे व गुंतवणूक या संदर्भातील 77 वी राष्ट्रीय नमूना पाहणी घेण्यात येत आहे. या पाहणीच्या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा नुकताच दिनेश वाघ, सह संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी वामन काळे, सह संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
केंद्र शासनाकडून प्राप्त़्ा झालेल्या यादीमधील गावांमध्ये व शहरांमध्ये सदर सर्वेक्षण जानेवारी, 2019 ते डिसेंबर, 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणात पत्रक क्र.1 (33.1) मध्ये शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्या पासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी होणारा खर्च, सदर पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्त्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, इ. माहिती ग्रामीण भागात गोळा करण्यात येणार आहे.
तसेच पत्रक क्र.2 (18.2) मध्ये ग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबांकडे त्यांनी केलेली गुंतवणूक व त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता व दायित्वे (व्यवसायासह) याबाबतची विस्तृत माहिती संकलित करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणातंर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडील नियुक्त अन्वेषकांमार्फत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या जिल्हयांमध्ये यादृच्छीक पध्दतीने निवड केलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष दोन वेळा भेट देवून 33.1 व 18.2 या पत्रकांतील माहिती संकलित करण्यात येणार आहे. सदर पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर कृषिविषयक आणि कर्ज विषयक धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जाणार आहे. तरी सर्वेक्षणासंबंधातील परीपूर्ण व योग्य माहिती देऊन सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय कामास निवड केलेल्या कुटुंबांनी सहकार्य करावे. असे आवाहन दिनेश वाघ, सह संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.