शेअर बाजारात मोठी उसळी; Sensex ५३,५०० वर, तर निफ्टीने ओलांडला १६ हजारांचा आकडा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात  करोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर सोमवारी संध्याकाळी राज्य सरकारने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. एकीकडे S&P BSE Sensex ने नवा उच्चांक गाठला असून दुसरीकडे निफ्टीने देखील आजपर्यंतचा सर्वाधिक १६ हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे शेअर बाजारानं निर्बंध शिथिल केल्याचं पहिल्याच दिवशी जोरदार स्वागत केल्याचं दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

 

दुपारी एकच्या सुमारास मुंबई शेअर बाजारात प्रचंड उत्साहवर्धक स्थिती निर्माण झाली. यामध्ये सेन्सेक्सनं तब्बल 558 अंकांनी उसळी घेत ५३ हजार 509.04 पर्यंत मजल मारली असून दुसरीकडे निफ्टी फिफ्टी देखील पहिल्यांदाच १६ हजारांवर गेला आहे. बाजारात निर्माण झालेल्या या सकारात्मक उर्जेमुळे आयटी आणि कन्झ्युमर स्टॉक्समध्ये देखील घसघशीत भर पडली आहे.

आयटी आणि कन्झ्युमर स्टॉक्समध्ये घसघशीत वाढ होण्यामध्ये सकारात्मक आर्थिक निर्देशकांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोविड-१९चे निर्बंध देशपातळीवर काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे जुलै २०२१मध्ये भारतातील कारखान्यांमधील कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी उत्पादन क्षेत्रात भरघोस वाढ होऊ लागली आहे. या कारणामुळे अधिकाधिक उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. त्याचा देखील परिणाम बाजारपेठेमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यात झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.