मुंबई : जागतिक बाजारपेठेवर कोरोना विषाणूचा परिणाम होताना दिसत आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी कोसळला. निफ्टीत ५०० अकांहून अधिक घसरण झाली .यात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच आशियाई बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी चांगलेच गडगडले आहेत.
जागतिक बाजारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सोमवारीही कायम राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बॅंकेने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे जगात वेगाने संक्रमण होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारांमध्ये दिसला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये घसरण झाल्याचे सोमवारी सकाळी दिसले. एक डॉलरसाठी 74.11 रुपये इतके मोजावे लागणार असल्याचे सोमवारी सकाळी दिसले. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 73.91 एवढ्यावर होता.
दरम्यान, गेल्या आठवड्यातही शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सुरूवातीच्या कारभारात सेन्सेक्स 3100 अंकांनी घसरला होता. एवढ्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार 45 मिनिटांसाठी ठप्प होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,325.34 अंकांनी वधारला असून, 34103.48 वर मार्केट बंद झालं. तर निफ्टी 433.55 अंकांनी वाढून 10023.70 वर बंद झाला होता.