शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणीस शासनाची मान्यता

0

शिवजयंतीदिनी भुमीपुजन, सार्व.बां.विभागाकडून अवर्गीकृत करण्यास परवानगी

चाळीसगांव.दि11-
शहराच्या मध्यवर्ती सिग्नल पॉईंट येथील त्रिकोणी जागेतील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व प्रस्तावित शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन पालिकेने काही वर्षांपूर्वीच केले होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. शासनाने सोमवारी यातील रस्ता अवर्गीकृत करण्याचा निर्देश दिल्याने पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली असून सिग्नल पॉईंट ते मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने अवर्गीकृत करण्याला सोमवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीदिनी येथे पुतळ्याचे भूमिपूजन करण्याला वेग येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा पालिका हद्दीतील सोलापूर-औरंगाबाद-धुळे रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211) अंतर्गत सिग्नल पॉईंट परीसरात उभारण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलनेही सुरूच ठेवली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मालेगाव नाक्यापर्यंतचा रस्ता अवर्गीकृत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे टाऊन प्लॅनिंगच्या मान्यतेलाही आडकाठी येणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून आमदार उन्मेष पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत असे म्हटले जात आहे.
सिग्नल पॉईंट परिसरातील सर्वे क्रमांक 51 मधील त्रिकोणाकृती जागेतील 680 चौ.मी. जागा याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभाग व महसूल विभागाकडून पालिकेला हस्तांतरण करण्यात आली आहे. तसेच पालिकेमार्फतदेखील शिवपुतळ्याची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र याा जागेजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या 100 मीटर अंतरात कोणतेही स्मारक व बांधकाम करता येत नव्हते. ही जागा राष्ट्रीय महामार्गाकडून अवर्गीकृत व्हावी, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासून होती. याबाबत पाठपुरावा झाल्याने शासनाने मान्यता दिली आहे.
तीन कि.मी. रस्ता अवर्गीकृत
चाळीसगाव नगरपालिका हद्दीअंतर्गत सोलापूर-औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील साखळी क्रमांक 397/800 ते 401/00 सूमारे 3.20 कि.मी लांबीचा रस्ता अवर्गीकृत करण्यात आला आहे. या परीसरात सिग्नल पॉईंट येथे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टीही उभारण्यात येणार आहे.

20 रोजी होणार भूमिपूजन
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. सोमवारी सार्व.बांधकाम विभागाने अवर्गीकृत करण्यासह राज्य शासना कडून परवानगी दिल्याने पुतळा उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. 20 रोजी नियोजित जागेवर भूमिपूजन करण्यात येईल.
– आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, न.पा.,चाळीसगाव

Leave A Reply

Your email address will not be published.