शिवाजीरोडचे अतिक्रमण पुन्हा जैसे थे

0

जळगाव – शिवाजी रोड (फ्रुट गल्ली) चे अतिक्रमणाने पुन्हा तोंड वर काढले आहे. दुपारपासून शिवाजी रोडवरील गर्दी वाढत जाते. संध्याकाळी सदर रस्त्यावरुन चालायलाही जागा शिल्लक राहत नाही. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अतिक्रमण विभागाने शिवाजी रोडवरील अतिक्रमण हटविले. मात्र संध्याकाळी अतिक्रमण पुन्हा जैसे थे झालेले होते.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्वत: अतिक्रमण हटाव मोहिम राबवून कारवाईत सहभाग घेवून शिवाजी रोडसह शहरातील अतिक्रमण हटविले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला होता. त्यांच्या बदलीनंतर काही दिवसातच पुन्हा शिवाजी रोडवरील अतिक्रमण वाढले आहे. तत्कालीन कारवाईत शिवाजी रोडवरील दोन्ही गटारीवरील अतिक्रमण काढून गटारी मोकळ्या केल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत गटारीवर पुन्हा अतिक्रमण वाढले आहे. शुक्रवारी दुपारी अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती. मात्र कर्मचारी परतल्यावर पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण अवतरले. संध्याकाळी रस्त्यावरुन चालणेही मुश्किल झाले होते.

बी. जे. मार्केटकडील कारवाई रखडली

अतिक्रमण विभागाकडून दोन दिवसात गुजराथी गल्ली ते बी. जे. मार्केट या रस्त्यावर कारवाई करत राधे राधे व सत्यब्रह्म या भरीत सेंटरवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण काढले. याच बाजूला पुढे  थोडसेच अतिक्रमण शिल्लक राहिले होते. ते शुक्रवारी काढण्यात येणार होते. संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र शुक्रवारी जेसीबीद्वारे नालेसफाईचे काम होत असल्याने अतिक्रमण विभागाला जेसीबीच प्राप्त न झाल्याने आजची कारवाई रखडली आहे. शनिवार, रविवारच्या सुटीनंतर सोमवारीच कारवाई होणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक एच.एम. खान यांनी सांगितले.

बायोमायनिंगसाठी सव्वाचार कोटीचा निधी मंजूर

स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा याची विभागणी करण्यात येवुन न कुजणारा कचरा विकला जाईल तर पुर्वीच्या 1 लाख टन मेट्रीक कचर्‍याचे खत बनविण्यात येईल.  यासाठी  4कोटी 26 लाख निधी मंजूर झाला आहे. पुढच्या आठवड्यात  निविदा काढण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.