जळगाव/ धरणगाव –
माझ्या वाढदिवसाची आजची ही सभा म्हणजे जनसंपर्क आणि लोकशक्ती तपासण्याचा दिवस आहे. हजारोच्या संख्येने तुमची असलेली उपस्थिती हीच समाजकार्याची प्रेरणा असून शिवसैनिक व जनतेचे पाठबळ हेच माझ्या जीवनाचे उर्जास्त्रोत आहे असे भावोद्गार शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री तथा उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. जळगाव जिल्हा व ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मंत्रीपदाचा फायदा झाला याचे मोठे समाधान असल्याचेही पाळधी येथे आयोजित भव्य जाहीर सभेत शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी पाळधी येथे आज भव्य जाहीर सभा घेण्यात आली. मागील 21 वर्षाची परंपरा असलेल्या या जाहीर सभेने भूतकाळातील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल दहा हजाराच्या वर नागरिक महिला भगिनी, शिवसैनिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थिती लावून खानदेशातील लाडके नेतृत्व ना. गुलाबराव पाटील यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. या जाहीर सभेप्रसंगी शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत हे अध्यक्षस्थानी होते. तर खासदार उन्मेष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, पाचोराचे आमदार किशोर पाटील, चोपडाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावचे आमदार सुरेश भोळे, माजी आमदार चिमणराव पाटील, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, पी. एम. पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, चंद्रशेखर अत्तरदे, शिवसेनेचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगरप्रमुख शरद तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत बोलताना माजी आ. चिमणराव पाटील म्हणाले की, ना. गुलाबराव पाटील यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवले असून ते भाग्यवान आहेत. गुलाबभाऊ म्हणजे कार्यकर्त्यांचे चैतन्य आहे. आमदार किशोर पाटील यांनी विकास कामे खेचून आणणारे कार्यसम्राट राज्यमंत्री असल्याचा गौरव त्यांच्या भाषणात केला. खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भाषणात सर्व संपत्तीपेक्षा गुलाबभाऊंकडे कार्यकर्त्यांची संपत्ती असल्याने नामदार गुलाबराव पाटील हे खर्या अर्थाने श्रीमंत आहेत असे सांगून आगामी काळात तन-मन-धनाने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेना व महायुतीचे कार्यकर्ते जळगाव ग्रामीण मधून एक लाखाच्यावर मताधिक्याने पुढच्या वेळी गुलाबभाऊंना निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केला. तर अध्यक्ष समारोप करताना संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले की, राज्यातील जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले नेतृत्व म्हणजे नामदार गुलाबराव पाटील आहेत. कार्यकर्ते नेत्याची वाट पाहतात मात्र कार्यकर्ते वाट पाहतील हा विचार मनात आणून त्यांच्या भेटीसाठी जाणारे पहिले नेते आज मी गुलाबभाऊंचा रूपाने पाहिले आहेत. गुलाबराव पाटील म्हणजे दूरदृष्टी असलेले विकसनशील नेते आहेत.
वाढदिवसानिमित्त आयोजित या सभेत सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, मागील 20 वर्षापासून वाढदिवसानिमित्त ही सभा घेतली जाते. माझ्या राजकीय व सामाजिक वाटचालीत पाळधी गावाचा मोठा आधार आहे. जात -पात -धर्म -पंथ विसरून सर्व नागरिक माझ्या पाठीशी उभे असून हे प्रेम व जिव्हाळा मला मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेना-भाजपा महायुतीचा मी पहिला आमदार असेल की, ज्यांच्यासाठी मुस्लिम बांधवांनी संदल सारखी मिरवणूक काढून मतदान केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला मंत्रिपदाची संधी दिली यामागे संघटनेतील एकनिष्ठता आहे. मोठे मोठे नेते शिवसेनेतून फुटून बाहेर पडले मात्र आम्ही बळी पडलो नाही. शिवसेनेत निष्ठेला व प्रामाणिकपणाला किंमत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजीव पणाने प्रचार केला. शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमधील हे प्रेम असेच कायम राहणार असून राज्यात 225 च्या खाली महायुतीचे एकही आमदार कमी होणार नाहीत असा विश्वासही नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रिपदाच्या माध्यमातून विकास कामे करून जळगाव जिल्हा मतदारसंघाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ शकलो याचे समाधान असल्याचेही ते म्हणाले. जळगाव ग्रामीण मध्ये लोकसभेला 64 हजारांचे मताधिक्य महायुतीला मिळाले असून विरोधक कोणीही असले तरीही तुमच्या आशीर्वादाने त्यांना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही असेही ना. पाटील यांनी सांगितले. या सभेला उपस्थित राहून दाखवलेल्या विश्वास व प्रेमाबद्दल मी आपला कायम ऋणी असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
सुरवातीला ना.गुलाबराव पाटील यांचा जिल्हा शिवसेनेतर्फे भव्य सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. धरणगाव नागरपालिके मार्फत गोधन माता सेवा समितीला गोमाता पालनासाठी 1 लाखाचा धनादेश राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजयजी सावंत, खासदार उन्मेष पाटील,व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सरपंच प्रकाश पाटील, जळगाव शहर संपर्क प्रमुख समाधान पाटील,जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,प्रतापराव पाटील,गोपाल चौधरी, पंचायत समिती सभापती पती अनिल पाटील, पं स सदस्य नंदलाल पाटील, जनाअप्पा कोळी, रावसाहेब पाटील, प्रेमराज पाटील, जानकिराम पाटील,महिला आघाडीचे शोभा चौधरी, जनाअक्का पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी केले.सूत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माजी गट नेते विश्वनाथ पाटील यांनी केले तर आभार जेष्ठ कार्यकर्ते गोकुलनाना पाटील यांनी मानले.