ठाणे जिल्ह्यातील समन्वयकांनी घेतली भूमिका
ठाणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षण, हॉस्टेल यांच्यासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय सहभाग आणि पुढाकार घेणार्या मराठा उमेदवारांसह ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका रविवारी ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. तशी घोषणा ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील वसतिगृहाचा प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने समाजासाठी स्वंतत्र स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे नेहमीच सक्रीय राहिलेले असल्याने शिवसेना-भाजप महायुतीचे कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा देत असल्याची भूमिका मराठा महासंघाचे सरचिटणीस सुरेश माने, कैलाश म्हापदी, रमेश आंब्रे, अविनाश पवार, राजेंद्र पालांडे, इंद्रजित घाडगे, सचिन भोसले, भाऊसाहेब सावंत, अजित जाधव, सदानंद भोसले, संतोष गोळे, अतुल मालुसरे, दीपक पालांडे, कांचन साळुंखे, तपशा कशफ आदी ठाणे, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी, पालघरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतल्याचे रविवारी जाहीर केले.
भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा सेवा प्रतिष्ठानचाही पाठिंबा
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी भारतीय मराठा महासंघ, सकल मराठा सेवा प्रतिष्ठान या संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आगरी सेनेने शिवसेना-भाजप महायुतीला बिनाशर्त पाठिंबा जाहीर केला असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील आगरी समाजातील विविध नेत्यांनीही डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आगरी समाजाच्या सुखदुःखात सदैव सोबत राहाणाऱ्या महायुतीला साथ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे चांगलेच जड झाले आहे.
कल्याण पूर्व येथे झंझावाती प्रचार
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील नांदिवली, आशेळे, माणेरे, भाल, द्वारली, वसार आदी गावांमध्ये रविवारी डॉ. शिंदे यांची झंझावाती प्रचार रॅली झाली. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षांत तब्बल २०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. तसेच, लोकसहभागातून येथील तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढल्यामुळे पाणीटंचाईतून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणीटंचाई विरोधातले हे युद्ध असेच सुरू राहाणार असून शेवटच्या घटकाला पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप कल्याण पूर्व जिल्हाध्यक्ष संदीप सिंग, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, संजय मोरे आदी पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
वडार समाजाचाही पाठिंबा
वडार समाजाची हक्काची संघटना असलेल्या मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचा निर्धार मेळावा रविवारी उल्हासनगर येथे पार पडला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वडार समाजाच्या महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौघुले, आमदार डॉ. बालाजी किणिकर, भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अनेक पदाधिकारी तथा शिवसेना-भाजपचे असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.