राज्य सरकारनं दिली आकडेवारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला ११ फेब्रुवारी रोजी १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात दोन लाख 33 हजार 738 नागरिकांनी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.
गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या एक लाखांहून अधिक (1 लाख 5 हजार 887) झाली होती. आता 11 फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये, इ. ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची ११३०० थाळींची संख्या आता १४६३९ वर पोहोचली आहे.
लाभार्थ्यांना फक्त १० रुपयात थाळी
या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा अस्वाद घेता येतो. उर्वरित फरकाची रक्कम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अनुदान स्वरूपात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना आणि मुंबई आणि ठाण्यासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्याची तरतूद योजनेत आहे. योजनेत राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत.

