मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी 11 हजार 417 नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन ही आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
ज्या खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेस च्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविली जात आहे म्हणजेच ज्या केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्या केंद्रातून योजनेअंतर्गत दुपारी 12 ते 2 यावेळेत जेवण उपलब्ध करून दिले जाते. लाभार्थींच्या 10 रुपयांच्या रकमेव्यतिरिक्तची उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्रचालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यभरात प्रारंभ
शिवभोजन योजनेत अकोला जिल्ह्यात 2, अमरावतीमध्ये 3, बुलढाण्यात 3, वाशिममध्ये 2, औरंगाबाद मध्ये 4, बीड मध्ये 1, हिंगोलीत 1, जालन्यात 2, लातूर मध्ये 1, नांदेडमध्ये 4, उस्मानाबाद मध्ये 3, परभणीमध्ये 2, पालघरमध्ये 3, रायगड मध्ये 4, रत्नागिरीमध्ये 3, सिंधुदूर्ग मध्ये 2, परळ 3, अंधेरी 3, वडाळा 2, ठाणे 7, कांदिवली 2, भंडारा 2, चंद्रपूर 3, गडचिरोली 1, गोंदिया 2, नागपूर 7, वर्धा 2, अहमदनगर 5, धुळे 4, जळगाव 7, नंदूरबार 2, नाशिक 4, कोल्हापूर 4, पुणे 10, सांगली 3, सातारा 4, सोलापूर 5 अशी केंद्रे सुरु झालेली आहेत. काल संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.