जळगाव :- तालुक्यातील शिरसोलीत एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेला १० लाख रुपये किंमत असलेला १० हजार २०५ किलो ग्रॅम वजनाचा गांजा एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास जप्त केला आहे. या प्रकरणी आकाश राजकुमार बालाणी (रा.गायत्रीनगर प्लॉट क्रमांक ९७) व भारत टकमदास पोपटाणी (रा.जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीचे पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे बुधवारी सकाळी पोलिस ठाण्याच्या कामासाठी शिरसोली येथे गेले होते. शिरसोली येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना गावातून मिळाली. त्यानुसार एक संशयित त्यांना दुचाकीवर (एमएच-१९, डीएफ-४१५२) प्रवासी वाहतूक बॅग घेऊन जाताना दिसला. त्यास थांबवून विचारपूस केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे राठोड त्याला घेऊन पोलिस चौकीत गेले. त्यावेळी केलेल्या चौकशीमध्ये त्याने बॅगमध्ये दहा किलो गांजा असल्याचे सांगितले. राठोड यांनी तात्काळ बीट अधिकारी राजकुमार ससाणे यांना याबाबत माहिती दिली. त्या विक्रेत्याने नाव आकाश बालाणी असून जळगाव येथील भारत पोपटाणी याच्याकडून ताे गांजा आणल्याचे त्याने सांगितले. बालाणी याच्याजवळील बॅगमध्ये पाच प्लास्टिक पॅकेटमध्ये १० लाख रुपये किमतीचा १० हजार २०५ किलोग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजाचे वजन करून जागीच पंचनामा केला.
मिळालेल्या गांजामधून प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे ३ नमुने वेगवेगळ्या पाकीटमध्ये काढण्यात आले. उर्वरित माल पोलिस व पंचाच्या सहिच्या लेबलने सील करण्यात आला. दरम्यान, शिरसाेलीत माेठ्या प्रमाणात गांज्याचा साठा जप्त करण्यात अाल्याने खळबळ उडाली. पाेलिस अाणखी कसून शाेध घेत असल्याचे सांगण्यात अाले.

