शिक्षणासाठी चिमुरड्यांच्या आयुष्याची आहुती कशासाठी?

1

– शाळा उघडण्याचा अट्टाहास नको

– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ

पाचोरा (प्रतिनिधी) : आयुष्य असेल तर शिक्षणाचा उपयोग आहे आणि आयुष्यच नसेल तर शिक्षण कुचकामी ठरेल या उक्तीप्रमाणे आजच्या परिस्थितीत शाळा उघडण्याचा अट्टाहास म्हणजे केवळ चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा बालिशपणा शासन आणि प्रशासनाकडून होता कामा नये असे एक संस्थाचालक म्हणून मनापासून वाटते. शासनातील मंत्री आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी  संस्था आणि शाळांना शाळा उघडण्यास संबंधित संदिग्ध आदेश देण्यापूर्वी सर्व स्तरातील आणि सर्व घटकातील विद्यार्थ्यांच्या  शाळांचा  आणि संस्थांचा सर्वसमावेशक विचार करूनच  योग्य निर्णय घेणे हे आज अनिवार्य झाले आहे.

कोरोनाशी लढा देताना शाळांपासून आणि अभ्यासापासून किंचित दुरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडताना त्यांचे योग्य रक्षण होणे हे मोठे आव्हान संस्थाचालक, शाळा आणि समाजासाठी ठरणार आहे.शासनाचा कुठलाही एकांगी निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा घातक निर्णय ठरू शकतो. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वसमावेशक, सर्वव्यापी विचारमंथन होणे गरजेचे असून त्यानंतरच शिक्षणाची दालनं उघडी करणे गरजेचे आहे. संस्थाचालक आणि शाळा मर्यादित क्षेत्रात अर्थातच शाळा, वर्गखोल्या निर्जंतुकीकरण  करण्यापासून ते विद्यार्थ्यांना सॅनेटाइज करण्यापर्यंत जबाबदारी काही अंशी पेलू शकत असल्या तरी विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संक्रमण होणारच नाही याची शाश्वती आजच्या परिस्थितीत शासन देऊ शकत नाही तर संस्था आणि शाळा कशा देऊ शकतील हा यक्षप्रश्न आहे. कोरोना संक्रमण ज्या पद्धतीने घडते त्याचा अभ्यास केल्यास बाहेरून अर्थात समाजातल्या विविध स्तरांमधून आणि शहरातील आणि गावातील विविध भागांमधून येणारा विद्यार्थी किंवा त्यासोबत येणारे पालक, तो विद्यार्थी ज्या वाहनातून शाळेत पोहोचणार आहे ते वाहन चालक किंवा ते वाहन संपूर्ण कोरोना संक्रमण मुक्त आहेत याची शाश्वती कोण आणि कशी देऊ शकेल?एकदा जर कोरोनाबाधित एखादा विद्यार्थी पालक किंवा एखादा शिक्षक सुद्धा शाळेच्या संपर्कात आला तर त्याच्या परिणामांची कल्पना न केलेलीच बरी असे म्हणावे लागेल.

केवळ शाळा उघडणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे असा एकांगी विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो म्हणूनच शाळा सुरु करत असताना सर्वव्यापी विचार होणे आजच्या घडीला आवश्यक आहे.सध्या ज्या वेगाने भारतात कोरोना संक्रमण होत आहे आणि समूह संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे ते पाहता शाळा उशिरा सुरू करणे हा एक पर्याय म्हणून स्वीकारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास कोरोनामुक्त गाव, शहर, जिल्हा आणि राज्य झाल्यास शनिवार-रविवार सारख्या सुट्ट्या किंवा अनावश्यक असणाऱ्या सुट्ट्या देखील शालेय कामकाजासाठी वापरून विद्यार्थ्यांचा मागे राहिलेला अभ्यास पूर्ण केला जाऊ शकतो आणि शिक्षक वर्ग देखील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ आणि परिश्रम खर्च करतील हा एक संस्थाचालक म्हणून विश्वास वाटतो. याशिवाय संस्थाचालक शाळा किंवा प्रशासकीय संस्थांना किंवा अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांमध्ये कोरोना प्रसारासाठी जबाबदार धरणे हास्यास्पद ठरेल. कुठलीही संस्था शाळा किंवा शाळेशी संबंधित असलेल्या घटकाला आपल्या शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षक करुणा बाधित व्हावा हे कधीही वाटणे शक्य नाही आणि विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक जण त्यासाठी कसोशीने प्रयत्न करेलच परंतु दुर्दैवाने शाळेत कोरोना संक्रमण झाल्यास त्या शाळेला, शिक्षकांना किंवा संस्थेला जबाबदार धरणे किंवा शाळेवर किंवा संस्थेवर ती जबाबदारी निश्चित करणे आततायी ठरेल.

शाळेत येणारा विद्यार्थी शाळेपेक्षा अधिक काळ समाजात आणि कुटुंबात वावरणारा आहे त्यामुळे कोरोना संक्रमणापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवायचे असेल तर विद्यार्थ्यांना शाळेपासून काही काळ दूर ठेवल्यास काहीही वावगे होणार नाही. शाळा, शिक्षक आणि संस्था विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक वेळ शाळा, शिक्षक आणि संस्था देतीलच यात शंका नाही परंतु शाळा उघडण्याच्या एकमेव अट्टाहासासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही. शेवटी आयुष्यासाठी शिक्षण आहे परंतु शिक्षणासाठी अनेकांच्या आरोग्याची आहुती देणे कितपत योग्य ठरेल याचा विचार होणे गरजेचे आहे.

1 Comment
  1. संजय पाटील says

    खूपच छान व समर्पक विचार मांडलेत.शिक्षण क्षेत्राला एक योग्य दिशा देऊ शकेल हा लेख.

Leave A Reply

Your email address will not be published.