सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
सुरगाणा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, मोहपाडा या शाळेतील विद्यार्थांनी शिक्षण : शाळा, पुस्तकापलीकडचे या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्याशी ऑनलाईन मुलाखतीच्या स्वरूपात संवाद साधला.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नामदेव वाजे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सन १९९४ पासूनचा शाळेचा शैक्षणिक प्रवास याविषयी एक चित्रफीत दाखविण्यात आली. शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थींनी भाग्यश्री गायकवाड हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरचिटणीस नीलिमाताई पवार यांचे बालपण, शैक्षणिक प्रवास, कुटूंबातील जबाबदारी, संस्थेतील त्यांना प्रवास, संस्थेचा इतिहास, सामाजिक जीवन, संस्थेचे कामकाज, कोरोना काळात बदलती शिक्षण पद्धती आदी मुद्द्यांवर चर्चा केली. बदलत्या काळात प्रामाणिकपणा कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. यासाठी मूल्यशिक्षणाची गरज आहे.
शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, जीवनात संघर्ष करा, प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास नक्कीच जीवनात यश मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोना काळातील बदलती परिस्थिती बघता ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असले तरी मोबाईल आणि इंटरनेट वापरताना विद्यार्थांनी योग्य व उपयुक्त वापर करावा, अन्यथा चुकीचा किंवा अयोग्य वापर आपल्या जीवनात न भरून नुकसान करू शकते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
तसेच ऑनलाईन संवाद या स्वरूपातील ‘शिक्षण: शाळा, पुस्तकापलीकडचे’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण असे व्यक्तिमत्वांची भेट घडते, त्याचा त्यांच्या जीवनात नक्कीच फायदा होईल आणि असा उपक्रम संपूर्ण मविप्र समाजाच्या शाखांमध्ये राबविण्याचा मानस व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.