जळगाव -गेल्या सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या शाहूनगरच्या नाल्याचे बांधकाम अद्यापही होत नसून यामागील काय गौडबंगाल आहे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सदर नाला खोदून ठेवण्यात आलेला आहे. गोविंदा रिक्षा स्टॉपकडून शाहूनगराला जोडणार्या मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील हनुमान मंदिराला लागून असलेला ढापा गेल्या सहा महिन्यांपासून तोडण्यात आला आहे. त्यामुळे भागातील नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांना फिरुन जावे लागत आहे. अंतयात्राही फिरवून न्यावी लागत आहे. एका व्यक्तीला येता येईल असा तात्पुरता पत्रा टाकण्यात आला आहे.
कधी वाळूचा तर आता आचारसंहितेचा बहाणा
शाहूनगर पुलासंबंधी संबंधित अधिकार्यांना विचारले असता जिल्ह्यात वाळूचा प्रश्न निर्माण झाला होता, असे सांगण्यात आले. मात्र याच रस्त्यावर एक टोलेजंग मार्केट बांधण्यात येत आहे. तेथे वाळू कशी उपलब्ध होते? असा सवाल नागरिक विचारत आहेत. शासनाकडून मिळालेल्या 25 कोटीच्या निधीची मुदत संपलेली आहे. संबंधित कामाच्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत.सदरची मुदत आचारसंहिता संपल्यानंतर वाढवून मिळणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर पाठपुरावा करावा लागणार आहे.
रस्त्याला साधे डांबर नाही
शाहूनगरामागील पिंप्राळा रेल्वे गेटला जोडणार्या रस्त्यावर 50 फुटापर्यंत डांबरच लावले गेलेले नाही. त्यामुळे रस्ता दगडगोट्यांचा बनलेला आहे. वाहनांमुळे दगडही चांगले घासले जावून गुळगुळीत झाले आहेत. येथून जाताना 50 फुटी स्पीडब्रेकरचा अनुभव येतो.तर शिवाजीनगर पुल तोडल्यामुळे शिवाजीनगरची वाहतूक इकडे वळली आहे. त्या नागरिकांच्या त्रासात नाल्याची दुरावस्था, नादुरुस्त रस्त्यांने समस्येत भर पडली आहे.
नालेसफाईच्या निविदेला मक्तेदारांचा नकार
शहरात उपनाल्यांची सफाई झाली आहे मात्र मुख्य नाल्यांची सफाई झालेली नाही. मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी प्रशासनाने निविदा काढली आहे.मात्र निविदेत मागचेच दर लावले आहेत. निविदेत केवळ जेसीबीचेच दर दिलेले आहेत. मात्र पोकलॅण्डचे दर दिलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
आ. भोळेंचे दुर्लक्ष- प्रशांत नाईक
मेहरुण ते ममुराबाद नाल्याजवळील घरे नेहमी पाण्याखाली येतात. 15 एप्रिलपासूनच शहरात नालेसफाई मोहिम राबविली पाहिजे होती. मात्र मे संपत असूनही नालेसफाई नाही. प्रशासन याबाबत गंभीर नसून आ. राजुमामा भोळेंचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला.
सेना नगरसेवकांचा प्रभाग; राजकारणाचा आरोप
शाहुनगरचा प्रभाग शिवसेनेतर्फे माजी महापौर नितीन लढ्ढा, राखी सोेनवणे, विष्णू भंगाळे, सौ. तायडे यांचा प्रभाग असल्याचे नागरिकांनी सांगितले. विरोधी पक्षातील नगरसेवकांचा प्रभाग असल्यामुळे सदर नाल्याकडे व प्रभागातील समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे सुज्ञ सांगत आहेत. नागरिकांच्या सोयीच्या बाबतीतही सत्ताधारी राजकारण करत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.