लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ ला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव आहे. 6 जानेवारी 2022 रोजी जितेशने महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून शाहरुखचा बंगला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली होती. यामध्ये त्याने शाहरुखच्या बंगल्यासह मुंबईतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट करणार असल्याची देखील धमकी दिली होती.
दरम्यान मुंबई पोलिसांनी कॉल ट्रेस केला आणि तो नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याचे पोलिसांना समजले. सीएसपी आलोक शर्मा म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्र पोलिसांकडून कॉल आला की जबलपूरमधून दहशतवादी हल्ला करण्याचा काॅल आला आहे. त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यांनी आमची मदत घेतली. आम्ही त्या व्यक्ती अटक केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”
धमकी देणारा आरोपी जेरबंद
जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल खंडेल यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्र पोलिसांनी एक मोबाईल नंबर शेअर केला होता, ज्याच्या आधारे जितेश ठाकूरला अटक करण्यात आली आहे. खंडेल यांनी सांगितले की, आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही खोटे कॉल करून पोलिसांच्या एसओएस सेवेच्या डायल 100 या कर्मचाऱ्यांशी भांडण केले होते. फोन केल्यानंतर अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली.