शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घेतली, त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव श्री. ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार एम. के. पवार, गटविकास अधिकारी श्री. भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम. एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक एस. बी. पाटील आदि उपस्थित होते.

याठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर 28 विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here