जळगाव दि.-
पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले होते. यादरम्यान श्री स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे राज्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सहवेदना निधी संकलित करण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आला होता. हा निधी त्या वीरपत्नींना 12 एप्रिल शुक्रवारी सायंकाळी 6 वा. कांताई सभागृहात होणार्या कार्यक्रमात अर्पण केला जावून त्यांचा आर्थिक सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी मेजर जनरल जी. डी. बक्षी यांचे दहशतवाद कल- आज और कल याविषयावर देशभक्तीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रविवारी बालाजी प्लाझा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. समवेत स्वप्निल चौधरी व हेमंत चंदनकर आदींची उपस्थिती होती.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ व भारतीय लष्कराला पाठबळ देण्यासाठी श्री विवेकानंद संस्थेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हल्ल्यात शहीद मलकापूर येथील संजयसिंह राजपूत आणि चोरपांगरा येथील नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद मंडळाने हाती घेतलेल्या सहवेदना निधी संकलन उपक्रमात आज पावेतो 12 लाख 8 हजार 458 लाख तसेच ग.स. सोसायटीकडून 10 लाख रुपये असे एकुण 22 लाख रुपये निधी संकलित झाला आहे. तसेच जळगावातून 25 लाखाचा निधी गोळा व्हायला हवा, अशी आशा कैलास सोनवणे यांनी व्यक्त केली. सदर उपक्रमास जनता बँकेचेही सहकार्य लाभत आहे.
मेजर जनरल जी.डी. बक्षी यांचे व्याख्यान
वीरपत्नींच्या सन्मानाप्रसंगी मेजर जनरल जी.डी. बक्षी यांचे दहशतवाद कल- आज और कल या विषयावर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. मेजर जनरल बक्षी हे जम्मू- काश्मिर रायफल्समध्ये कार्यरत होते. कारगिल युद्धात बटालियनचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान बटालियनच्या कमांडींगमध्ये त्यांना प्रतिष्ठीत सेवेसाठी सेनापदक देण्यात आले. त्यानंतर त्यांनी जम्मू- काश्मिरच्या राजौरी- पुंछ जिल्ह्यातील तीव्र दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान रोमियो फोर्स यांना आदेश दिला आणि या क्षेत्रातील दहशतवादी कारवाया दडपून टाकण्यात ते यशस्वी झाले होते. भारतीय सेनेतील त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना महानिर्देशालयामध्ये कार्य करण्याची संधी देण्यात आली होती.