जळगाव, दि.30- शहरात मे अखेर 377 गळत्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर 72 ठिकाणी अद्यापही गळत्या आहेत. पाणी पुरवठा विभागातर्फे गळत्यांचा अहवाल गुरुवारी देण्यात आला.
टंचाई आढावा बैठकीत मिळाले आदेश
गेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पाणी पुरवठा विभागाला शहरातील गळत्यांबाबतअहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी खडबडून जागे झालेल्या विभागाने उशिरा का होईना अहवाल सादर केला आहे.पाणी पुरवठा विभागातील 9 शाखा अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रातील गळत्यांचा अहवाल सादर केला आहे. दि. 1 मे ते 28 मे दरम्यान शहरात विविध ठिकाणी 377 गळत्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र अद्यापही 72 ठिकाणी गळत्या कायम आहेत. त्यांच्याही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. शहरात नेहमीच पाणी टंचाई असते. याचे प्रमुख कारण पाईपलाईन तसेच व्हॉल्व्ह ठिकाणी होणार्या गळत्या आहेत. शहरातील गळत्या दुरुस्त झाल्यास पाण्याची बचत होवून बरीचशी पाणी टंचाई कमी होईल, त्यानुसार उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत दिले होते. त्यानुसार गुरुवारी अहवाल त्यांना सादर करण्यात आला.