शहरातील वृत्तपत्रांच्या नामवंत पत्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम… पत्र चोरिताना…

0

प्रथम पत्रकारांचे मुख्य सरदार मचकुंद एडके साहेब …
मी- साहेब मूळ मुद्याकडे येण्याआधी तुमच्या नावाविषयी विचारायचे होते. कारण, आम्ही मुकुंद ऐकले होते पण मचकुंदचा अर्थ?
साहेब- अ‍ॅक्चुलीऽऽऽऽ, त्याच असं झालं की मला डायबेटीस मधुमेह आहे. माझ्याकडे एक शिकावू डीटीपी ऑपरेटर होता. तो टाईप करताना नेहमीच माझं नाव चुकवायचा यामुळे नेहमी चिडून डायबीटीस वाढविण्यापेक्षा मी माझं नावचं बदलून घेतले मचकुंद एडके!
मी -(प्रेक्षकांना उद्देशून)- मित्रहो, वृत्तपत्रात मुद्रितशोधनाला अनन्य साधारण महत्व आहे. थोड्याशा चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होतो. उदा. सुरेशदादांच्या ऐवजी भुरेशदादा, नाना वाणींच्या ऐवजी पाना वाणी.. गुलाबरावांच्या ऐवजी जुलाबराव वगैरे… वगैरे….
मी- असो, मित्रांनो आता नुकतेच दै. विदेशीदूतचे संपादक दुरभाष सोनवणे यांचं आगमन होत आहे.(आगमनाचं संगीत- टूम … टूम… टूम… ठस, टूम … टूम… टूम… ठस, टूम … टूम… टूम… ठस)
हं, तर दूरभाष यासाठी कारण, साहेब नेहमीच टेलिफोनच्या गराड्यात असायचे. हा फोन ठेवला की दुसरा, दुसरा ठेवला की तिसरा… मोबाईल नेहमी चालूचं आपण भेटायला गेलो अणि बोलणं झाल तर नशीब टेलीफोन पावला म्हणायचा. साहेब रागावले तर भुंगा चावला म्हणायचा. तो चावतो न चावतो तोच कुणीतरी धावत येताना दिसतायेत. अरे हो ! हे तर दै. धावकरीचे संपादक बोरुधर पानट आहेत. हं, या साहेब कार्यक्रमात आपले स्वागत आहे. (चष्म्यातून नजर फिरवत) ठीक आहे.
मी- साहेब, तुम्हाला सुरुवातीलाच रॅपीड फायरिंग प्रश्न विचारतो, तुमच्यातील वक्तेपणाचा तुम्हाला शोध कधी लागला?
साहेब- त्याचे असे झाले की, आमच्या दैनिकाच्या रफ पेपरवर माझ्या बोरुचे अक्षरं नेहमीच फुटायचे. त्यामुळे ऑपरेटरला ती अक्षरे वाचताचं येईनात. त्यामुळे त्याला सर्व तोंडी सांगाव लागे आणि असे सांगत असतानाच माझी काय म्हणता ती ट्युब पेटली व मी वक्ता होण्याचे ठरविले. या ठिकाणी महाराणा प्रतापांची गोष्ट आठवते…
साहेब – महाराणा प्रताप असू द्या… मी- नाही हो…. नाही असू द्या
मी- (प्रेक्षकांना संबोधत)- तुम्हाला मौत का कुव्व्यातील गाडीचा आवाज येतोय का? हो हाच तो जाना पहचाना आवाज अनिलदादांच्या जुन्या स्कुटरचा आवाज (दादा येतात) चष्म्यातून डोळे किलकिले करत नाक, तोंड जवळ करत किंचीत जीभ दातांना स्पर्शून आतबाहेर करत दादा येतात… एसीमध्येही ऑपरेटरला घाम फोडणारं हे व्यक्तीमत्व!
माझा प्रश्न – शहरातील मान्यवर पत्रकारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपलं स्वागत हं, दादा पत्र चोरिताना या विषयावर काय मार्गदर्शन कराल?
दादा- (नेहमीचं हअं, हअं, हअं, हअं हसत) अरे! तू अगदी बाळबोध आहेस. मी काय केले एक हुशार डीटीपी ऑपरेटर सोबत ठेवला आहे. मी सकाळी आल्यावर इतर दैनिकातील महत्वाच्या लिखाणांवर खुणा करुन देतो कोणती बातमी मुख्य करायची पानाच्या सुरुवातीच्या मधल्या, शेवटच्या बातम्या (टॉप, मिडल, बॉटम) खुणा करुन देतो. संध्याकाळी पान नुसतेच तपासून प्रिंटींगला सोडतो. आणि मग मधल्या वेळेत दिवसभर स्कुटरवर गावात फिरण्याचा आनंद घेतो. (स्कुटरला किक मारत निघतात.)
मी प्रेक्षकांना उद्देशून :- मित्रहो, हे होते दादा आणि आता येत आहेत दै. पितृभूमीचे कलकत्ता मसालाचं तोबरं दिवसभर मिरवणारे भगरवाल साहेब…
साहेब- अरे भाई! कोई डिक्कत (पानाचा तोबरा चावून पिचकारी मारुन).. (त्यांच्या कार्यालयातील डीटीपी ऑपरेटर्सना उद्देशून..) अरे यार ! कुछ स्पीड वीड बढावो, कुछ काम दिखाओ! (एक मद्यपी डीटीपी ऑपरेटर कॉम्प्युटरवरुन त्यांच्याकडे पाहत… नागोबासारखी जीभ काढत म्हणतो.) स्पीड वाढणार नाही! एवढाच राहील हो पण कमी होणार नाही. भगरवालांचा नाईलाज… याच कार्यालयात एक देशप्रेमी उपसंपादक होते. पगार झाला की ऐश दोनतीन दिवस ऑफिसला दांडी मग नंतर धुंदीतच संपादक मित्राला फोन करायचे अळे याळ मी तुझा मोठा भाऊ आहेळे! माझ्याकडून साहेबांना सांग, अरे माझी दिवाळी अंधारात जाईलरे एवढे कळ रे मोठ्या भावासाठी वगैरे … याच कार्यालयात भिंतीवर चालणारा प्राणी म्हणजे पाल आणि वॉल म्हणजे भिंत अशाच नावाचे एक संपादक होते. (पाली+वाल) ते कार्यालयात आल्यावर नेहमीच म्हणायचे, टांगा पलटी घोडे फरार! आता कोणी असो वा नसो मै हुँ ना! आता शेंडी तुटो की पारंबी तुटो काम आटोपल्याशिवाय मी उठणार नाही
मी प्रेक्षकाना उद्देशून- मित्रहो, उन्हाळ्याच्या दिवसांत तर घामाच्या धारा चालू असताना कुणावरही न रागवता रात्री बनियनवर बसून लेख लिहिणारे व बातम्यांवर शेवटचा संस्कार करणारे कर्तव्यनिष्ठ, कामासाठी घरदार सोडून कामालाच सर्वस्व मानणारी ही मंडळी, विरळीच! असो.
मी- (पत्रकारांच्या येण्याच्या दिशेने बघत येणार्‍या व्यक्तीला बघून घाबरा होत भितीने गांगरुन जात ततपप करायला लागतो) ह, हा, ही, ही, हु,हे,है ! हे दै. देशीधारचे नुकतेच होवू घातलेले नेते सदविवेक कठाकरे! य, या या या साहेब! (माझ्याकडे व सर्वांकडे रागाने बघत डोळे लालबुंद करून फिरवत, मला उद्देशून म्हणतात)
साहेब- काहो, मला बघून एवढं घाबरायला काय झालं? तुम्ही तर एकदम बाराखाडीवर आले. मानसासारखा मानूस अन्…, मी – न… न. नाही!
साहेब- अहो! मी पण तुमच्यासारखा माणुसच आहे, काही वेळा कर्तव्यकठोर होतो इतकचं
मी- हो तर साहेब तुम्ही नुकताच तुमचा ट्रॅक चेंज केला आहे त्याबद्दल?
साहेब- अहो! त्याच्याशिवाय मला पर्यायच नव्हता. तुम्हाला तर माहितीये कशाला येडी घाली कडी करी राहले. चला येतो. फैजपूरले जायच हे भाऊनले भेटायच आहे बरं येतो मंग (हात दाखवत येतात.)
मी – (सनईचा सूर काढतो पपपपपपपंपंपंपं व म्हणतो) हे तर जुनं झालं आता, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ.. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ डी.जे. जी. म्हणजेत धो.ज.गुरव साहेब येत आहे. अभीभी मै जवान हुँ, अभीभी मै जवान हुँ साहेब येतात
साहेब- अहो, आपला फुढारी येतोय.
मी- सर, भाऊ, दादा आणि मामांच्या गावात आता नवीन फुढारी कशाला? नेमके दिल्लीचे राजकुमार येताहेत की अच्छेदिन बुरेदिनवाले येताहेत?
साहेब- दै. फुढारी येत आहे.
मी- होका! नेमका प्लेनने येतोय, रेल्वेने की बैलगाडीने?
साहेब- येतोय हो तुम्ही शुभारंभ जाहिरातीचे बघा! ते जाऊ द्या ठोकशाहीला एक डबलकरची बातमी द्या, जाहिरातीचे काय ते बघा,
मी- सर या देशाने अवघी गांधीशाही अनुभवली, मोदीशाही अनुभवली आता ठोकशाहीची तुम्हाला आठवण येतेय.
साहेब- असूद्या हो! जाहिरातीचे बघा बरं जय बाबा रामदेव फुस… फुस.. फुस…!
मी- आता येत आहेत. पान 4 वरील फोटोमुळे आम्हाला नेहमी परममोद देणारे दै. बाईमतचे परमोद बारहाते साहेब.. साहेब स्वागत! महिलांनाही न्याय व पुरुषांनाही सुखावणार्‍या तुमच्या कार्यामुळे येत्या 8 मार्चला दीन महिला मंडळातर्फे तुमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेव्हा जरुर या !
मित्रहो! या लोकांबद्दल बोलायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, शेवटी आप बको हमे एतबार है। अरे, बुरा ना मानो भाई आज होली है। धन्यवाद!!!

(सदर लिखाणात दिवंगत सुभाष सोनवणे व विद्याधर पानट या महनीय व्यक्तींबाबत विडंबन आले आहे. याबाबत कोणालाही दुखवायचे किंवा त्यांचा अपमान नसून ते हयात असताना लिहिलेले आहे तसेच ते आपल्यात आहेत असा भास आहे.. यामुळे त्यांची आठवण कायम राहिल ही प्रांजळ भावना आहे.)

 

Leave A Reply

Your email address will not be published.