17 महिन्याच्या बालकाचा उपचारादरम्यान झाला होता मृत्यू : 2016 ची घटना शव विच्छेदन अहवालानंतर कारवाई
जळगाव, दि.24 –
शहरातील दोन वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये सन 2016 मध्ये 17 महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करीत असतांना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी, चिमुकल्याच्या शवविच्छेदनाचा व्हिसेरा प्राप्त झाल्यानंतर रविवार 24 रोजी याप्रकरणी आठ वैद्यकीय व्यवसायीकांविरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुलसीनगर परिसरातील तन्मय गोपाळ भवरे (वय 17 महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव असून गोपाळ भरवे कुटुंबासह रामेश्वर कॉलनीतील संस्कृती शाळाजवळ राहतात. भरवे यांना दोन मुलीनंतर मुलगा झाला होता.
27 डिसेंबर 2015 रोजी तन्मयला सर्दी, ताप आला होता. वडील गोपाळ भवरे व आई सोनाली यांनी सागर पार्क जवळील डॉ.राजेश शिंपी यांच्या अमेय हॉस्पिटल वर्धमाननगर येथे त्याला आणले. या ठिकाणी रक्ताचा रिपोर्ट करुन इंजेक्शन देण्यात आले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर 2 जानेवारी 2016 ला तन्मयला सुटी देण्यात आली. त्यानंतर त्याला 4 रोजी चिरायू हॉस्पीटलमध्ये दखल करण्यात आले. 9 जानेवारी 2016 रोजी तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तन्मयच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने त्याच्या आई-वडीलांनी आक्षेप घेत धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. तीन वर्षांनी धुळे येथून शवविच्छेदन अहवाल जिल्हापेठ पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आठ डॉक्टरांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या डॉक्टरांविरूध्द गुन्हा
भवरे कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालरोगतज्ञ डॉ.राजेश श्रीकृष्ण शिंपी, शल्यचिकित्सक डॉ.गिरीश इच्छाराम गाजरे, भूलतज्ञ डॉ.एच. आर.बर्हाटे, डॉ.अमित नारखेडे, डॉ.संजीव चौधरी, डॉ.अविनाश भोसले, डॉ.ऋषाली सरोदे, डॉ.सारिका सुरवाडे यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक संदीप आराक पुढील तपास करीत आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी नामांकित समजल्या जाणार्या रुग्णालयात आयकर विभागाने कारवाई केली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच तीन वर्षापूर्वीच्या दीडवर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणी धुळे येथे शासकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवार 24 रोजी प्राप्त झाल्यानुसार जिल्हा पेठ पोलीसठाण्यात आठ वैद्यकीय व्यवसायीकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.