मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर ते मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहोचले आहेत. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. नवाब मलिक यांनी सांगितलं की, शरद पवार यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि 15 दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. आपल्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आणि शरद पवार यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

