अंबरनाथ
अंबरनाथमध्ये व्हॉट्सअॅपवर सतत गुंग असल्यामुळे पालक रागावले म्हणून मुलीने थेट घरातूनच पलायन केल्याचे समोर आले आहे. मात्र एक सतर्क नागरिक आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अंबरनाथच्या पश्चिम भागात राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या कॉलेजमधील मित्रांसोबत फिरायला गेली होती. तिथून आल्यावर व्हॉट्सअपवर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिला रागावली. याच रागातून या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातून पलायन केले होते. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला भयभीत अवस्थेत आढळली होती. मुलीने आईवडिलांकडे जायचे असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्या महिलेने या मुलीला नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नेले. तेथे पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता, ही मुलगी अंबरनाथ येथील राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्याशी संपर्क करत माहिती दिली आणि अंबरनाथ पोलिसांकडे तिला सुरक्षित सोपवले होते. अंबरनाथ पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले. आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. मात्र व्हॉट्सअॅप वापराच्या क्षुल्लक कारणावरून पालक रागावल्याने मुलीने थेट घरातून पलायन केल्याने सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.