शासकीय कामात अडथळा आणला: उपायुक्तांची पोलिसांत तक्रार
जळगाव(प्रतिनिधी)– दिलेल्या मुदतीत थकबाकीदार गाळेधारकांवर दुकाने सीलची कारवार्इसाठी गेलेल्या उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना गाळेधारकांनी प्रचंड विरोध करत कोंडण्याचा प्रयत्न केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात उपायुक्त व कर्मचाऱ्यांनी धाव घेत सहा ते सात गाळेधारकांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत फिर्याद दिली. यावेळी फुले मार्केट व शहर पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण होते. महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली. तीन गाळे सील केल्यानंतर एका गाळेधारकाच्या दोन गाळ्यावर कारवाई करत असताना महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुटे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून घेरुन कोंडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांत गाळेधारकांविरुद्ध फिर्याद देण्यात आली. दरम्यान गाळेधारकांनीही शहर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रशासनाविरुद्ध तक्रार दिली. यावेळी प्रशासनाकडून व गाळेधारक यांनी परस्परांविरुद्ध आरोप केले आहेत.
उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्न
येथील महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व किरकोळ वसुली पथक संयुक्तपणे कारवाईसाठी आज दि.14 रोजी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी फुले मार्केटमध्ये आले. यावेळी 115, 16, 17, सील केले. त्यानंतर महेंद्र नाथानी यांच्या मालकीच्या गाळे नं. 5 व 48 ज्योती क्रिएशन या दुकानाला सील करण्यासाठी पथक गेले असता उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे व कर्मचाऱ्यांना घेराव घालून दुकानात कोंडण्याचा प्रकार करण्यात आला.
कारवार्इ चालूच राहणार- उपायुक्त
या प्रकारानंतरही उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी जोपर्यंत थकीत बाकी वसुल होत नाही तोपर्यंत कारवार्इ चालूच राहणार असून प्रशासनावर कोणताच दबाव नसून कारवार्इ चालूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी लोकशाही प्रतिनिधीस दिली.