आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) –जिल्हा सामान्य रुग्णालयात दि. 24 ते27 ऑगस्टदरम्यान विनामुल्य वैद्यकीय व महादंतआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ नाशिकच्या डॉ. रत्ना रावखंडे यांनी दि.22 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. पोटोडे, नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाणे, सहाय्यक संचालक डॉ. एम. आर. पट्टनशेट्टी, डॉ. प्रमोद पांढरे आदी उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. सर्वप्रकारचे गंभीर आजारांवर मोफत तपासणी, मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. सर्व उपचार मोफत आहे. उपचारासह रुग्णांना जेवण व राहण्याची मोफत सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे डॉ. रावखंडे यांनी सांगितले. मोफत उपचाराचा लाभ गंभीर आजारांवर महागडे उपचार करु न शकणाऱ्या वंचित घटकांनी प्राधान्याने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम तपासणी करुन घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.