वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू !
पाचही वैद्यकीय अधिकारी भुर्रर : धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
धानोरा, ता. चोपडा ;- परिसरातील सोळा गावांसाठी वरदान ठरणाऱ्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आदिवासी महिलेला मृत्यूचे तोंड पहावे लागलेे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे भोंगळ कारभार सुरु असून वरिष्ठांनी देखील दुर्लक्ष केल्याने रुग्णांना सेवा मिळण्याऐवजी त्यांचे हालच अधिक होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी तर दोन प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मोठा कर्मचारी वर्ग आहे. मात्र रविवार दि. 19 मे रोजी दुपारी हे आरोग्य केंद्र रामभरोसे असल्याने एका आदिवासी महिलेला मृत्यूने कवटाळल्याचा आरोप होत आहे.
येथून जवळच असलेल्या कुंड्यापाणी येथील एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला उपचारासाठी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी आणले असता येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने संबंधित महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
नबाबाई समीर पावरा (वय 28, रा. कुंड्यापाणी, ता. चोपडा) असे मयत महिलेचे नाव असून त्या कुंड्यापाणी येथे पती समीर, 3 मुले यांच्यासह राहत होत्या. नबाबाई ह्या चौथ्यांदा गरोदर होत्या. त्यांचे 9 महिने भरलेले होते. रविवारी दि. 19 मे रोजी सकाळी घरातच नबाबाई हिची प्रसूती झाली. नाळ तुटत नसल्याने तत्काळ महिलेला धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नबाबाई हिची प्रकृती खालावली. पुढील उपचारार्थ तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात घेवून जात असतांनाच तिचा वाटेत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
आरोग्य केंद्र रामभरोसे
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 16 गावांचा भार असून परिसरातून राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे रात्री-अपरात्री अपघाताच्या घटना घडत असतात. नियमाप्रमाणे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने येथे थांबणे बंधनकारक असतांना देखील हे सारे अधिकारी दुपारीच भुर्रर होत असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी देखील केल्यात मात्र वरिष्ठांनीही दखल घेतली नसल्याने येथील डॉक्टरांना चांगलेच फावले आहे.
कायमस्वरुपी डॉक्टर नियुक्त करा
परिसरात नित्याने अपघात वा आजारपणाच्या घटना घडत असताना नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले डॉक्टर येथे उपलब्ध नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असतांनाही येथे कुणीही थांबत नसल्याने अशा अप्रिय घटना घडत आहेत. येत्या आठ दिवसात येथे कायमस्वरुपी डॉक्टर नियुक्त करावा अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जार्इल.
– प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते
…अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकणार
परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी हे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने नागरिकांचा लाखमोलाचा जीव मातीमोल होत आहे. वरिष्ठांनी दखल घेवून त्वरीत कायमस्वरुपी व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकले जार्इल.
– दीपक साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रविवारचा प्रकार काय झाला याची माहिती घेवून त्यात कुणाचा दोष आहे, ते शोधले जार्इल. अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही. यात जो कुणी दोषी असेल त्याच्यावर नक्कीच कारवार्इ होर्इल.
– डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव