उत्तराखंड ;- वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात केदारनाथ येथील दरवाजे आज (रविवार) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास उघडण्यात आले. यावेळी राज्यपाल के.के.पॉल हेही उपस्थित होते. केदारनाथ दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होती.
दरम्यान, राज्य सरकारकडून केदारनाथ धाम परिसरात विकासकामे करण्यात आली आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. तत्पूर्वी उखीमठचे ओमकारेश्वर मंदिरमधून दि. २६ एप्रिल रोजी शिवशंकरांची पालखी केदारनाथसाठी रवाना झाली होती. ती पालखी आज सकाळी येथे पोहोचली. आता उद्या (दि.३० एप्रिल) सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातील. यावर्षी चारधाम यात्रेची सुरूवात १८ एप्रिलपासून गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पट उघडल्यानंतर झाली.
वर्ष २०१७ मध्ये ४.०९ लाख भाविकांनी गंगोत्री, ३.९२ लाख यमुनोत्री आणि ४.७१ लाख भाविकांनी केदारनाथ आणि ८.८५ लाख जणांनी बद्रीनाथचे दर्शन घेतले होते. राज्य सरकारच्या मते यंदा एकूण आकडा हा ३० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर राज्यसरकारकडून पहिल्यांदाच लेसर शोचे आयोजन केले जाणार आहे जे ४ मेपर्यंत सुरू राहील.